Coronavirus : अशी घ्या ज्येष्ठ नागरिकांची काळजी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संवेदनशील गट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 03:59 AM2020-03-21T03:59:48+5:302020-03-21T04:00:11+5:30
ब-याचदा ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्याचप्रमाणे, लहान मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुदृढ नसते. या घटकांनी आजारी व्यक्तींचा संपर्क कटाक्षाने टाळावा.
मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्भवती महिलांनी, ज्येष्ठ नागरिक आणि लहानग्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज वैद्यकीय तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. या संवेदनशील गटातील व्यक्तींच्या प्रतिकार शक्तीत बदल होत असतो. शिवाय, शरीरातील बदल, अन्य आजारपण व वातावरणातील बदलांचा परिणाम या संवेदनशील गटातील व्यक्तींवर अन्य घटकांपेक्षा लवकर होतो. त्यामुळे कोरोना व अन्य संसर्ग टाळण्यासाठी संवेदनशील घटकांची विशेष काळजी घेतली पाहिजे, असे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले.
याविषयी सल्लागार प्रसूती व स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सुरभी सिद्धार्थ यांनी सांगितले, गरोदर महिलांच्या प्रतिकारक्षमतेमध्ये आणि शरीरात बदल होत असल्यामुळे विषाणूचा, विशेषत: कोविड१९चा श्वसनयंत्रणेत प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते, हे सर्वांनाच माहीत आहे. या विषाणूंमुळे साध्या सर्दीपासून ते मिडल ईस्ट रेस्पिरेटरी सिण्ड्रोम (एमईआर-सीओव्ही) आणि सिव्हिअर अॅक्युट रेस्पिरेटरी सिण्ड्रोम (सार्स-सीओव्ही) यांसारखे गंभीर आजार होऊ शकतात. गर्भवतींना फ्लूसारखे विषाणूजन्य श्वसनाचे आजार होण्याची शक्यता असते आणि त्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो.
याचा अवलंब करा
हात सारखे स्वच्छ धुवा : साबण आणि पाण्याने हात वारंवार धुवा किंवा हँड सॅनिटायझरचा वापर करा.
हात न धुता डोळ्यांना, नाकाला आणि तोंडाला स्पर्श करू नका. जवळचा संपर्क टाळा : गर्दीच्या ठिकाणी जाऊन नका आणि आजारी लोकांच्या जास्त संपर्कात येऊ नका.
तुम्ही आजारी असाल तर घरीच थांबा, खोकताना व शिंकताना तोंडासमोर रुमाल धरा किंवा मास्क घाला. वारंवार स्पर्श होणारे पृष्ठभाग स्वच्छ करा : टेबल, दरवाजाच्या मुठी, दिव्यांची बटणे, मोबाईल फोन, हँडल्स, काउंटरटॉप्स, कीबोर्ड, टॉयलेट, नळ आणि डेस्क्स अस्वच्छ ठेवू नका. सार्वजनिक ठिकाणी हात लावल्यावर हात स्वच्छ धुवा, चेहऱ्याला वारंवार हात लावू नका.
इंडियन मेडिकल असोसिएशनचे सदस्य डॉ. पार्थिव संघवी यांनी सांगितले, ब-याचदा ज्येष्ठ नागरिकांची प्रतिकार शक्ती कमी असते. त्याचप्रमाणे, लहान मुलांची शारीरिक व मानसिक स्थिती सुदृढ नसते. या घटकांनी आजारी व्यक्तींचा संपर्क कटाक्षाने टाळावा.