Join us

Coronavirus:...त्यामुळे बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची आता खैर नाही; अजितदादांचा सज्जड दम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 01, 2020 1:58 PM

राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत.

ठळक मुद्देबाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आला आहेराज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे.सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील - अजित पवार

मुंबई -  इटली, अमेरिका, स्पेनमधील ‘कोरोना’ बळींपासून धडा शिकून जनतेने आतातरी शहाणं व्हावं. जीवाची जोखीम पत्करुन ‘कोरोना’विरुद्ध लढणाऱ्या डॉक्टर, पॅरामेडिकल स्टाफ, पोलिस, सफाई कामगार, यासर्वांच्या त्यागाचा सन्मान करावा. भाजी खरेदीसाठी गर्दी करणं बंद करावं. घरातंच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान द्यावं, असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केलं आहे. तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्यात बेजबाबदारपणे वागणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही, असा सज्जड दमही त्यांनी भरला आहे.

राज्यातील ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. या पार्श्वभूमीवर भाजी खरेदीसाठी सकाळच्या बाजारात उसळणारी गर्दी बघितल्यानंतर लॉकडाऊनचा उद्देशच धोक्यात आला आहे. जनतेने घराबाहेर पडून अनावश्यक गर्दी करणं सुरुच ठेवलं तर सद्यस्थितीचा पुनर्विचार करुन कठोर उपाय योजावे लागतील, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे. 

कोरोनाच्या संकटाविरुद्ध राज्याचा सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकिय शिक्षण विभाग, पोलिस विभाग, नगरविकास विभाग, ग्रामविकास विभाग, महसुल विभाग, अन्न व नागरी पुरवठा, अन्न व औषध प्रशासन, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच शासनाची संपूर्ण यंत्रणा युद्धपातळीवर काम करत आहे. राज्यातील बहुतांश नागरिक घरीच थांबून कोरोनाविरुद्धच्या लढ्यात योगदान देत आहेत, या सर्वांचं उपमुख्यमंत्र्यांनी आभार मानले आहेत. तसेच बेजबाबदारपणानं वागणाऱ्या मोजक्या व्यक्तींमुळे ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला धक्का बसत आहे. हा बेजबाबदारपणा आता सहन केला जाणार नाही. ‘कोरोना’विरुद्धचा लढा जिंकायचा असेल, बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची, नियम मोडणाऱ्यांची यापुढे खैर केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा उपमुख्यमंत्र्यांनी दिला आहे.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न राज्य सरकारने मंगळवारी केला. राज्य सरकारने रोज दहा लाख लिटर दूध खरेदी करण्याचा निर्णय घेतला. सरकार 25 रुपये प्रतिलिटर दराने या दूधाची खरेदी करेल. येत्या चार-पाच दिवसांत हे संकलन सुरू होईल आणि ‘कोरोना’चा प्रादुर्भाव संपेपर्यंत पुढचे दोन महिने ही खरेदी सुरूच राहील, असा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीत मंगळवारी घेण्यात आला.

कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील दूधव्यवसाय आणि दुधउत्पादक शेतकरी संकटात आहेत. दूधाची विक्री घटल्याने गावागावांत दूध स्वीकारले जात नाही. राज्यात उत्पादित 12 लाख लिटर दुधापैकी 10 लाख लिटर दूध अतिरिक्त ठरत आहे. खाजगी बाजारात दूधाचा दर 15 ते 17 रुपये प्रतिलिटरपर्यंत खाली घसरला आहे. शेतकरी, शेतमजूर, गोरगरीब दूध उत्पादकांना याचा फटका बसत आहे. यामुळे या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तसेच कोरोनाच्या धक्क्यातून सावरण्यासाठी राज्यात अतिरिक्त ठरत असलेले 10 लाख लिटर दूध दूधसंस्थांच्या माध्यमातून शासन 25 रुपये प्रतिलिटर दराने खेरदी  करेल. त्या दुधाची भूकटी करून ती साठवली जाईल, नंतर त्याची ऑनलाईन विक्री केली जाईल, असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

 

टॅग्स :अजित पवारमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसपोलिस