१५०० कोटींच्या दानानंतर टाटांनी उघडले 'ताज'चे दार; कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्यांचं स्वागत करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 4, 2020 10:31 AM2020-04-04T10:31:32+5:302020-04-04T11:16:46+5:30
सध्या अनेक डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. यापैकी अनेक डॉक्टरांना घरी जाणेही अशक्य झालेले आहे. अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावला आहे.
मुंबई - देशात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेग गेल्या काही दिवसात वाढला आहे. त्यातही मुंबई आणि महाराष्ट्रात परिस्थिती गंभीर आहे. अशा वातावरणात डॉक्टर दिवस रात्र एक करून कोरोनाविरोधात लढा देत आहेत. आणीबाणीची परिस्थती असल्याने अनेक डॉक्टरांना घरी जाणेही अशक्य झाले. अशा डॉक्टरांसाठी आता टाटा समूह पुढे सरसावला आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असलेल्या डॉक्टरांना राहण्यासाठी आणि विश्रांतीसाठी टाटा समूहाने आपल्या पंचतारांकित हॉटेलचे दरवाजे उघडले आहेत.
कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना संसर्गाचा धोका असल्याने अशा डॉक्टरांना घरी जाता येत नाही. त्यामुळे या डॉक्टरांच्या निवासस्थानाची सोय करण्याचे आव्हान प्रशासनासमोर होते. मात्र टाटा समूहाने डॉक्टरांच्या राहण्याची सोय केल्याने प्रशासनासमोरील मोठा प्रश्न दूर झाले आहे. दरम्यान, टाटा समूहाने, यापूर्वी कोरोनाविरोधातील लढाईसाठी टाटा समूहाने सुमारे दीड हजार कोटी रुपयांची मदत केली होती. तसेच मुंबईतील विविध रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना भोजन पुरवण्याची व्यवस्था टाटा समूहाने केली होती.
टाटा समूहाने एकूण 7 हॉटेल डॉक्टरांसाठी उपलब्ध केली आहेत. यामध्ये ताज महाल पॅलेस, ताज लँड्स एंड, ताज संताक्रूझ, द प्रेसिडेंट, गिंगर एमआयडीसी अंधेरी, गिंगर मडगाव आणि गिंगर नोएडा या हॉटेलांचा समावेश आहे.
दरम्यान, कोरोना विषाणू विरोधातील लढ्यासाठी टाटा ट्रस्ट टाटा सन्सने १५०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. टाटा ट्रस्टचे चेअरमन रतन टाटा यांनी एका निवेदनाद्वारे ही घोषणा केली होती. टाटांनी या निवेदनात म्हटले होते की, सध्याची भारत आणि जगातील परिस्थिती कमालीची चिंताजनक बनली आहे. त्यावर तातडीने कृती करणे भाग आहे. टाटा ट्रस्ट आणि टाटा उद्योग समूह कसोटीच्या काळात नेहमीच देशाच्या मदतीस धावून आला आहे. सध्याची देशातील परिस्थिती भूतकाळातील कोणत्याही संकटापेक्षा अधिक भीषण आहे.