मुंबई - विद्यार्थी आई वडीलानंतर शिक्षकांच्या सर्वाधिक संपर्कात असतात ही बाब विचारात घेता शिक्षकांनी शाळेत उपस्थित राहून काम करण्याऐवजी वर्क फ्रॉम होम करण्याबाबत शालेय शिक्षण विभागाकडे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी शिफारस केली आहे. राज्यातील दहावी बारावी परीक्षा, आरटीई प्रवेश प्रक्रिया अशी अति महत्त्वाची कामे वगळता आवश्यकता असेल तरच शिक्षक कर्मचाऱ्यांना खबरदारी घेऊन शाळेत बोलवावे अशा सूचना व्यवस्थापनांना दिल्या आहेत.
ज्या शिक्षकांना दहावी बारावीचे पर्यवेक्षणाचे काम नाही अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सुट्टी देण्यात यावी, शाळेत बोलाविण्यात येऊ नये. तसेच सध्या शिक्षकांकडे दहावी बारावीच्या पेपर तपासणीचे काम आहे. सदर काम शाळेतून घरी नेऊन करण्याबाबत मुभा देण्यात यावी. हे काम शाळेत येऊनच करावे अशी सक्ती करू नये अशा मागण्या विविध संघटनानी केल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण आयुक्तांनी जिल्ह्याच्या शिक्षणाधिकारी, विभागीय शिक्षण उपसंचालक याना स्थानिक परिस्थिती विचारात घेऊन शाळांच्या व्यवस्थापनाना सूचना द्याव्यात असे निर्देशित केले आहे.
विविध मागण्यांच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाच्या सूचनेनुसार वर्क फ्रॉम होम करण्याची सूचना शिक्षण आयुक्तांकडून करण्यात आली आहे.