मुंबई : काेराेना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी महापालिकेने गर्दीच्या ठिकाणी कोरोना चाचण्या सुरू केल्या आहेत. मुंबईत दररोज सरासरी २५ हजार चाचण्या केल्या जातात. याचे प्रमाण दररोज ५० हजारांवर नेण्याचे लक्ष्य प्रशासनाने ठेवले आहेत. त्यानुसार सोमवारी मुंबईत लांब पल्ल्यांच्या गाड्या, बाजारपेठ, एसटीस्थानक, पर्यटन स्थळ, चौपाट्या, माॅल आदी ठिकाणी चाचण्या करण्यात आल्या. परिणामी, काही भागांमधील बाधित रुग्णांचा आकडा वाढल्याचे दिसून आले.
गेल्या महिन्यापासून कोरोनाचा प्रसार पुन्हा सुरू झाला आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचा आकडा आता २३ हजारांवर पोहोचला आहे. यापैकी १६ हजार ७७५ रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणे नाहीत. चाचणी न झालेले असे अनेक लक्षणविरहित रुग्ण मुंबईत फिरत असल्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याचा धोका अधिक असल्याने अशा रुग्णांचा शोध घेण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. महापालिका दररोज २० ते २२ हजार चाचण्या करीत आहे. चाचण्यांचे प्रमाण टप्प्याटप्याने वाढवून दररोज ५० हजार चाचण्या करण्याचे निर्देश आयुक्त इकबालसिंह चहल यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. यासाठी गर्दीच्या ठिकाणी दररोज किती लोकांची चाचणी करावी? याचे लक्ष्य निश्चित करण्यात आले.
दादरमधील चाचणीत सातजण आढळले बाधितमॉल्स, बाजारपेठ, चौपाट्या अशा गर्दीच्या ठिकाणी पालिकेचे पथक सोमवारी अँटिजेन चाचणी करताना दिसून येत होते. मुंबईचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या दादर भागात गर्दी वाढत असल्याने महापालिकेने येथे चाचणीचे प्रमाण वाढविले आहे. सोमवारी दादर स्थानकाबाहेर सेनापती बापट मार्गावर फेरीवाले व लोकांची अँटिजेन चाचणी करण्यात आली. एकूण ६८ लोक आणि काही फेरीवाल्यांची चाचणी करण्यात आली. यामध्ये सात बाधित आढळून आले, त्यांना क्वारंटाईन करण्यात आले. दिवसभरात सुमारे २० हजार चाचण्या करण्यात आल्या. तर विकेंडला २४ हजार २२० चाचण्या करण्यात आल्या होत्या.