मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईकरांसाठी बंद असलेली लोकल सेवा सुरु करण्याबाबत ठाकरे सरकारने संकेत दिले आहेत. लोकांची गर्दी पाहता लोकल सेवा बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. मात्र आता हळूहळू अनलॉक सुरु झालं असून चाकरमान्यांना कामावर जाण्यासाठी मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागते, अत्यावश्यक सेवा वगळता इतर कर्मचाऱ्यांना लोकल बंद असल्याने रस्ते वाहतुकीवरही त्याचा परिणाम पाहायला मिळतो.
अलीकडेच सरकारने महिलांसाठी विशेष वेळेत लोकलने प्रवास करण्याची मुभा दिली, त्यानंतर आता वकील, खासगी सुरक्षा रक्षक यांनाही लोकलने प्रवास करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे सामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा कधी सुरु करणार असा सवाल सोशल मीडियात विचारला जाऊ लागला आहे. लोकल सेवा सुरु नसल्याने बस अथवा रिक्षा याने नोकरदारांना प्रवास करावा लागतो, यासाठी त्यांचे अधिकचे पैसे खर्च होतात त्याचसोबत वाहतूक कोंडीचा मनस्तापही सहन करावा लागतो.
याबाबत संतप्त प्रवाशाने ट्विट करून म्हटलं आहे की, महिलांना लोकल सेवेची परवानगी मिळाली, वकिलांनाही लोकलमधून प्रवास करण्याची मुभा मिळाली. मग व्यावसायिक, कर्मचारी आणि सामान्य माणसांना लोकल सेवा सुरु का नाही? दिवाळी सणात लोकल प्रवास नसणं हा खूप मोठा अन्याय आहे अशी खंत त्याने व्यक्त केली. या ट्विटवर उत्तर देताना मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले की, येत्या काही दिवसांत सरकार लोकल ट्रेन सेवा सुरु करण्याचा निर्णय घेईल. त्यासाठी विविध जणांशी चर्चा सुरु आहे. यावर लवकरच मुंबईकरांना दिलासा मिळेल अशी ग्वाही त्यांनी या प्रवाशाला दिली आहे.
बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने धावणार, राज्य सरकारची मंजुरी
काही बस मार्गांवर गर्दीच्या वेळेत बसगाड्यांची मागणी अधिक असते. त्यामुळे अशा सर्व मार्गांचा आढावा घेऊन बसगाड्यांच्या फेऱ्या वाढविण्याचे नियोजन बेस्ट उपक्रमामार्फत सुरू आहे. ‘मिशन बिगिन अगेन’अंतर्गत गेल्या तीन महिन्यांमध्ये बेस्ट प्रवाशांची संख्या १८ लाखांवर पोहोचली. त्यामुळे पूर्ण क्षमतेने बससेवा सुरू करण्याची परवानगी मिळावी, अशी विनंती बेस्ट प्रशासनाने राज्य सरकारकडे केली होती. ही मागणी मान्य झाल्यामुळे बसगाड्यांवरील ताणही कमी करण्यासाठी बेस्ट बसेस पूर्ण क्षमतेने चालवण्यात येत आहेत
एका बसमध्ये ४० प्रवाशांचा बसून प्रवास
नव्या नियमानुसार, एका बसमध्ये ४० प्रवासी बसून आणि १६ प्रवाशांना उभ्याने प्रवास करता येईल. महिला प्रवाशांसाठी जून महिन्यात विशेष तेजस्विनी बससेवा विक्रोळी ते बॅकबे या मार्गावर सुरू करण्यात आली होती. येत्या काही दिवसांत महिला प्रवाशांकडून वाढती मागणी लक्षात घेऊन बसगाड्यांची संख्या वाढवण्याचा बेस्टचा विचार सुरू आहे.