Coronavirus: भारतात कोरोनाची चौथी लाट येणार नाही, मास्कची सक्ती हटवावी, डॉ. रवी गोडसे यांचं मोठं विधान
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2022 09:37 PM2022-03-19T21:37:38+5:302022-03-19T21:37:58+5:30
Coronavirus News: चीन, दक्षिण कोरियासह इतर देशांत कोरोनाची लाट आल्याने भारतातही कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढून कोरोनाची चौथी लाट येईल का, असा सवाल विचारला जात होता. त्यावर Dr. Ravi Godse यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मोठे भाकित केले आहे.
मुंबई - गेल्या काही दिवसांमध्ये चीन आणि इतर काही देशांमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढल्याने तसेच काही ठिकाणी लॉकडाऊन लावावे लागल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. चीन, दक्षिण कोरियासह इतर देशांत कोरोनाची लाट आल्याने भारतातही कोरोनाचा संसर्ग पुन्हा वाढून कोरोनाची चौथी लाट येईल का, असा सवाल विचारला जात होता. दरम्यान, कोरोनाकाळात आपल्या अचूक विश्लेषणातून कोरोनाबाबत भाष्य करणाऱ्या डॉ. रवी गोडसे यांनी कोरोनाच्या चौथ्या लाटेबाबत मोठे भाकित केले आहे. भारतात आता मास्क वापरण्याची गरज नाही. तसेच भारतात कोरोनाची चौथी लाटही येणार नाही, असं विधान डॉ. गोडसे यांनी केलं आहे.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. रवी गोडसे म्हणाले की, भारतातील कम्युनिटी ट्रान्समिशनचं प्रमाण पाहता भारतात आता मास्क वापरण्याची गरज आहे असं मला वाटत नाही, असं माझं वैद्यकीय वैयक्तिक मत आहे. हे मी हजारो रुग्णांवर केलेले उपचार आणि अनुभवातून सांगत आहे. गरज आहे असे वाटत नाही. अमेरिकेतील सर्व राज्यांनी आता मास्कची अनिवार्यता संपुष्टात आणली आहे. इटलीने टास्क फोर्सला सुट्टी दिली आहे. आता कोरोनासोबतच राहायचं आहे, याची जाणीव लोकांना झाली आहे. ओमायक्रॉनमुळे हॉस्पिटलमध्ये जाव्या लागलेल्या आणि तिथे ऑक्सिजनची गरज भासलेल्या किती लोकांना तुम्ही वैयक्तिकरीत्या ओळखता, याचा आढावा घेतला तर प्रत्येक माणसाला स्वत:चं उत्तर मिळेल.
कोरोनाच्या लाटेबाबत डॉ. रवी गोडसे म्हणाले की, कोरोनाची तिसरी लाट वगैरे भारतात आली नव्हती. तिसरी लाट आली नसल्याने चौथी लाट येण्याचा प्रश्नच नाही. कोरोनाची चौथी लाट वगैरे भारतात येणार नाही. त्यामुळे आपण सध्या जे काम करतोय ते सुरू ठेवलं पाहिजे. तसेच निर्बंध उठवून जे काही सुरू केलंय ते योग्यच आहे, असं मत डॉक्टर रवी गोडसे यांनी मांडले.
तसेच कोरोनाचे रुग्ण वाढल्यानंतर त्वरित लॉकडाऊन लावणाऱ्या चीनचा उल्लेख त्यांनी बावळट असा केला. ते म्हणाले, चीन बावळट आहे. झीरो कोविड ही संकल्पना तेव्हा चांगली होती. चीनमध्ये जेवढे रुग्ण आढळले त्याच्या अनेकपट रुग्ण हे अमेरिकेमध्ये एका दिवसात सापडले होते. चीनमध्ये एक रुग्ण सापडला तर ते २७ लाख लोकसंख्या असलेल्या संपूर्ण शहराचं लॉकडाऊन करतात. ४० ते ४५ दिवस क्वारेंटाईन करतात. हे हुकुमशाही देशाला शक्य आहे. भारतात ते शक्य नाही, असं केल्याने लोक उपासमारीने मरतील, असे रवी गोडसे म्हणाले.