- अजय परचुरेमुंबई : कोरोनाचे भयाण वास्तव दिवसेंदिवस वाढत असल्याने सरकारने चित्रपटगृहे, नाट्यगृहे तत्काळ बंद करण्याचा निर्णय घेतला. सरकारने खबरदारी म्हणून घेतलेला हा निर्णय नाटकांच्या प्रयोगावर अवलंबून असलेल्या रंगमंच कामगारांना मात्र चांगलाच फटका देऊन गेला. नाटकांचे प्रयोगच ठप्प झाल्याने या नाटकांच्या प्रयोगावर पोट असणाऱ्या किमान ७०० कामगारांना नाटक बंद असेपर्यंत हलाखीचे दिवस जगावे लागत होते. मात्र या रंगमंच कलाकारांच्या मदतीसाठी रंगमंच कामगार संघटना एक पालक म्हणून भक्कमपणे उभी राहिली आहे. सोमवारी रंगमंच कामगार संघटनेने प्रत्येक रंगमंच कलाकाराला प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत केली. यामुळे कोरोनाच्या फटक्याने त्रस्त असलेल्या रंगमंच कामगारांना थोडा का होईना सुखद दिलासा मिळाला आहे.कोरोनाच्या वाढत्या प्रसारामुळे राज्य शासनाने खबरदारी म्हणून शहरातील मॉल्स, चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे अनिश्चित काळापर्यंत बंद केली आहेत. मुळात नाट्य व्यवसाय सध्या सुट्टीच्या दिवशी आणि शनिवार - रविवार या दोन दिवशीतेजीत असतो. शनिवार आणि रविवार मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातीलप्रमुख शहरांतील नाट्यगृहांत व्यावसायिक नाटकांचे प्रयोग होत असतात. मात्र सरकारच्या तातडीच्या निर्णयामुळे सर्व नाट्यगृहांतील सर्व नाटकांचे प्रयोग रद्द झाले आहेत. यामुळे या सर्व नाटकांत नाटकाचे सेट लावणाºया, संगीत, प्रकाशयोजना, कपडेपट, वेशभूषा करणाºया किमान ७०० कामगारांना याचा फटका बसला. नाटकाचा प्रयोग झाल्यावर मिळणारी नाईट ही या कामगारांची हक्काची आणि मेहनतीची कमाई. मात्र अनिश्चित काळापर्यंत नाट्य प्रयोग बंद झाल्याने या सर्व रंगमंच कामगारांवर प्रयोग नाही, तर नाईट नाही, अशी वेळ आली होती.यावर तोडगा म्हणून आणि रंगमंच कामगारांवर उपासमारीची वेळ येऊ नये म्हणून रंगमंच कामगार संघटनेने हवालदिल झालेल्या या कामगारांना प्रत्येकी दोन हजार रुपये तात्पुरती मदत करण्याचा निर्णय नुकताच घेतला होता. त्याचीच पूर्तता म्हणून सोमवारपासून या रंगमंच कामगारांना मुंबईतील यशंवत नाट्यमंदिरातील रंगमंच कामगार संघटनेच्या कार्यालयात ही मदत वाटप करण्यात आली.आठ लाख खर्चया तात्पुरत्या मदतीमुळे रंगमंच कामगार संघटनेचे जवळपास आठ लाख रुपये खर्च झाले आहेत. मात्र हलाखीच्या परिस्थितीत मिळालेल्या या मदतीमुळे रंगमंच कलाकारांच्या चेहºयावर थोडे तरी हास्य फुलले आहे. या वेळी रंगमंच कामगार संघटनेचे विद्यमान अध्यक्ष किशोर वेल्हे, माजी अध्यक्ष रत्नकांत जगताप आदी उपस्थित होते.
Coronavirus : रंगमंच कामगारांना मिळाला ‘सुखद दिलासा’, कोरोनातही दिसले माणुसकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 3:04 AM