मुंबई : मंदिरे उघडण्याच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाही आक्रमक झाली आहे. अनलॉकमध्ये मॉल उघडणे, कार्यक्रमांना परवानगी दिली जात असताना मंदिरे उघडण्याबाबत महाविकास आघाडी सरकारला इतका आकस का, असा प्रश्न करत राज ठाकरे यांनी तातडीने मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्याची मागणी केली आहे. अन्यथा नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, असा इशाराच त्यांनी दिला आहे.मंदिरे उघडण्याबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले आहे. अनलॉक प्रक्रियेत विविध निर्बंध शिथील केले जात असताना मंदिरे सर्वात शेवटी उघडून उगाच नको ते पुरोगामित्व दाखवू नका. त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी त्यांनी केली. गेली पाच महिने अर्थकारण ठप्प आहे. आतातरी सरकारने सार्वजनिक वाहुतकीचे नीट नियोजन करून अर्थकारणाला धुगधुगी द्यावी अशी जनतेची अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.देव आणि त्याचे भक्त यांची ताटातूट करण्याचा फंदात सरकारने पडू नये. गावाची, शहराची अर्थव्यवस्था तेथील मंदिरावर अवलंबून असते. ती कोलमडणार असेल तर त्यांनी साकडे कोणाकडे घालावे, असा सवाल राज यांनी केला.
coronavirus: ...तर, सरकारी आदेश झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल - राज ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: September 04, 2020 3:51 AM