Coronavirus : राज्यात कोरोनाचे ३९ रुग्ण, राज्यात १०८ जण विलगीकरण कक्षात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 07:24 AM2020-03-17T07:24:10+5:302020-03-17T07:24:21+5:30
राज्यात १०८ लोक विलगीकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन आहेत. त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
मुंबई - राज्यात यवतमाळ येथे १ आणि नवी मुंबई येथे १ असे २ कोरोना रुग्ण आढळून आले. यामुळे राज्यातील कोरोना (कोविड - १९) बाधित रुग्णांची संख्या ३९ झाली आहे. राज्यात १०८ लोक विलगीकरण कक्षात दाखल असून १०६३ होम क्वारंटाईन आहेत. त्यापैकी ४४२ जणांचा १४ दिवसांचा पाठपुरावा पूर्ण झाला आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात सोमवारी ३१ संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे.
यवतमाळ येथे कोरोनाबाधित आढळलेली ५१ वर्षांची महिला ही दुबई सहलीला गेलेल्या चमूतील आयटी तज्ज्ञाची आई आहे. ती स्वत:ही सहलीत सहभागी होती. यामुळे यवतमाळमधील रुग्णांची संख्या ३ झाली. दुबईला गेलेल्या ४० जणांच्या चमूतील १५ कोरोनाबाधित, तर २२ निगेटिव्ह आढळले. चमूतील बेळगाव येथील तिघांना लक्षणे नसल्याने घरात विलग केले आहे.
सोमवारी कोरोनाबाधित आढळलेला दुसरा रुग्ण हा नवी मुंबई येथे आला होता, तो फिलिपाईन्सचा नागरिक आहे. फिलिपाईन्सहून नवी मुंबईत आलेल्या १० जणांच्या चमूतील तिघे कोरोनाबाधित असून इतर ७ जण निगेटिव्ह आहेत.
सरकारी कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरीला स्थगिती
कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यातील सर्व कार्यालयांतील बायोमेट्रिक हजेरीला तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने सोमवारी याबाबतचा शासन निर्णय जारी केला. बायोमेट्रिक पद्धत पुढील आदेश येईपर्यंत बंद आहे. कार्यालयांमधील उपस्थिती पूर्वीप्रमाणे हजेरीपटावर नोंदविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या विधिमंडळ अधिवेशनात अनेक आमदारांनी बायोमेट्रिक पद्धती काही काळासाठी बंद करण्याची मागणी केली होती.
काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे गरजेचे : मुंबई अहोरात्र जागी असते. येथे थांबायला कोणाकडेही वेळ नाही. कोरोना विषाणूने मुंबईकरांमध्ये भीती निर्माण केली असली तरी पोटापाण्यासाठी दैनंदिन व्यवहार करणे क्रमप्राप्त आहे. मग काय, मुंबईकर विक्रेत्यांनी कोरोनासाठीचे मास्क विकणे हाच रोजीरोटीचा व्यवसाय सुरू केला आहे. रेल्वेमधील मास्क खरेदी-विक्रीचे हे दृश्य म्हणजे ‘काळजी करण्यापेक्षा काळजी घेणे गरजेचे’ याचीच साक्ष पटवून देणारे आहे.
मुंबईतही एक पॉझिटिव्ह रुग्ण
कस्तुरबा रुग्णालयात सोमवारी मुंबईतील भांडुप येथील स्थानिक असलेली ४४ वर्षीय महिला कोरोनाबाधित असल्याचे निदान झाले आहे. ही महिला १६ मार्चला पोर्तुगालहून मुंबईत आली. १३ मार्च रोजी कस्तुरबा रुग्णालयात दाखल झाली, तिचा वैद्यकीय अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आल्याचे पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितले. तिच्या सहवासात आलेल्या दोन निकटवर्तीयांनाही १४ दिवसांकरिता विलगीकरण करण्यात आले आहे.
टॅक्सी चालकांना फटका
कोरोनामुळे देश-विदेशातील अनेक विमानांची उड्डाणे रद्द झाली आहेत. मुंबईत येणाऱ्या प्रवाशांची संख्याही कमी झाली आहे. दरम्यान, प्रवासी नसल्याने विमानतळ परिसरात टॅक्सीच्या पार्किंगच्या पुढे रांगा लागल्या आहेत. विमानतळ परिसरात टॅक्सी चालकांना एकेका प्रवाशासाठी १० ते १२ तास वाट पाहावी लागत आहे.
१ लाख ८९ हजार प्रवाशांची तपासणी
मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर १६ मार्चपर्यंत १६६३ विमानांमधील
१ लाख ८९ हजार ८८८ प्रवासी तपासण्यात आले. राज्यात आतापर्यंत बाधित भागातून एकूण १०६३ प्रवासी आले आहेत.
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षांत ७९४ जणांना भरती करण्यात आले आहे. त्यापैकी ७१७ जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोनासाठी निगेटिव्ह आले आहेत.
उच्च न्यायालय, जिल्हा न्यायालयांच्या कामकाजाच्या वेळेत कपात
उच्च न्यायालयानेही कामकाजाच्या वेळेत कपात केली. मुंबईसह नागपूर, औरंगाबाद खंडपीठाचे कामकाज दुपारी १२ ते २ वाजेपर्यंत दोन तास चालवावे तर जिल्हा न्यायालयांचे कामकाज तीन तासांपेक्षा अधिक असू नये, असे परिपत्रक उच्च न्यायालयाने काढले आहे.
सोमवारी प्रभारी मुख्य न्या. बी. पी. धर्माधिकारी यांनी अन्य ज्येष्ठ न्यायाधीशांबरोबर बैठक घेऊन हा निर्णय घेतला.दरदिवशी केवळ ५० टक्केच कर्मचाऱ्यांना हजेरी लावण्यास सांगावे, असे निर्देशही दिले.वकिलांनी व पक्षकारांनीही विनाकारण न्यायालयात गर्दी करू नये, असे आवाहन प्रभारी मुख्य न्या. बी.पी. धर्माधिकारी यांनी केले आहे. न्यायालयाने वकिलांनाही बार रूमचे कामकाज जास्त वेळ सुरू न ठेवण्याचे आवाहन केले आहे.
एसटी प्रशासन कर्मचा-यांना देणार मास्क
मुंबई : एसटी महामंडळात सुमारे ७० हजार चालक, वाहक दररोज ६५ लाख सर्वसामान्य प्रवाशांना सेवा देतात. त्यांचा सातत्याने अनेक प्रवाशांशी संपर्क येतो. त्यामुळे संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव त्यांना लगेच होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच चालक, वाहक यांच्यासह बसस्थानकांवरील वाहतूक निरीक्षक, वाहतूक नियंत्रक आणि इतर कर्मचाºयांना कोरोनाच्या प्रादुर्भावापासून बचाव करता यावा यासाठी एसटी प्रशासनाकडून त्यांना दररोज डिस्पोजेबल मास्क देण्यात येणार आहेत. याबाबतचे निर्देश एस.टी. प्रशासनातर्फे सर्व विभाग नियंत्रकांना देण्यात आले आहेत.
नीट पीजीसाठीची कागदपत्र पडताळणी प्रक्रिया सीईटी सेलने ढकलली पुढे : वैद्यकीय व दंत शाखेतील पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी नीट-पीजी २०२०, नीट-एमडीएस २०२० मार्फत प्रवेश मिळेल. कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रवेश प्रक्रियेत सहभागी होऊ इच्छिणाºया पात्र विद्यार्थ्यांच्या कागदपत्रांची १७ ते २२ मार्च व २३ ते २४ मार्चदरम्यान होणारी पडताळणी रद्द केली आहे. ही पडताळणी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात प्रवेश करताना त्यांची निवड प्रक्रिया झाल्यावर होईल, असे सीईटी सेलने स्पष्ट केले.
कचरावेचक महिलांनाही फटका
मुंबई : कोरोनामुळे सध्या भीतीचे वातावरण आहे. अनेक जण घराबाहेर पडणे टाळतात. हॉटेल, दुकानांमधील ग्राहकांच्या संख्येत घट झाली आहे. त्याचा फटका कचरावेचक महिलांनाही बसत असून त्यांना विक्रीसाठी मिळणाºया वस्तूंच्या प्रमाणात ५० टक्के घट झाली आहे, असे कचरावेचक महिलांनी सांगितले.
माहिम, हाजी अली दर्ग्यामध्ये गटागटाने येण्याऐवजी स्वतंत्रपणे येण्याचे आवाहन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे विविध प्रार्थनास्थळे बंद करण्यात येत असली तरी माहिम व हाजी अली दर्ग्यामध्ये प्रवेश दिला जात आहे. मात्र, भाविकांनी गटागटाने येण्याऐवजी स्वतंत्रपणे यावे व जास्त काळ दर्ग्यामध्ये रेंगाळू नये, असे आवाहन माहिम दर्गा व हाजी अली दर्ग्याचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी केले आहे.
कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी
मुंबई, ठाणे, तळोजा आणि कल्याण या मध्यवर्ती कारागृहांतील कैद्यांना सुनावणीसाठी कोर्टात हजर करण्यास बंदी घालण्यात आली आहे. पुढील आदेश येईपर्यंत कैद्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होईल. मुंबई विभागाचे महानिरीक्षक दीपक पांडे यांनी यास दुजोरा दिला आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनीही कैद्यांच्या वैद्यकीय तपासणीकडे लक्ष वेधत खबरदारी घेण्यास सांगितले. मुंबईच्या आर्थररोड कारागृहाची क्षमता ८०५ कैद्यांची आहे. गेल्या आठवड्यात कारागृहात सुुमारे ३८०० कैदी होते. दरम्यान त्यातील ४०० कैद्यांची रवानगी तुलनेने कमी गर्दी किंवा जास्त क्षमता असलेल्या तळोजा कारागृहात केली आहे. ठाणे, कल्याणच्या आधारवाडी कागरागृहांतूनही काही कैदी तळोजात हलविले आहेत. कारागृहांत विलगीकरण कक्ष तयार केले आहेत. आर्थररोड कारागृहात मंगळवारपासून निसर्गोपचार केंद्रही सुरू होईल.
फ्रान्सहून आलेल्यांच्या संपर्कातील इतरांचा तपासणी अहवाल निगेटिव्ह
ठाणे : ठाण्यात कोरोना व्हायरसने बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर तीनही व्यक्तींच्या टेस्ट निगेटिव्ह आल्याची माहिती ठाणे महापालिकेचे मुख्य आरोग्य अधिकारी अनिरुद्ध माळगावकर यांनी दिली.
गेल्या आठवड्यात ठाण्यात फ्रान्सवरून एक व्यक्ती दाखल झाली. तिची कोरोना तपासणी पॉझिटिव्ह आली. सध्या तिच्यावर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर आहे. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर तिघांची कोरोना तपासणी केली असता, तिचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे.
पालिकेच्या आरोग्य विभागाने आतापर्यंत ७० प्रवासी आणि त्यांच्या संपर्कात आलेले १३ अशा ८३ लोकांची तपासणी केली. ज्यांची तपासणी पॉझिटिव्ह आली, त्याच्या परिसरातील सुमारे एक हजार घरांचा सर्व्हे करण्यात आला. त्यातील एकाही व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणे आढळली नसल्याची माहिती माळगावकर यांनी दिली.