Join us

CoronaVirus News: लॉकडाऊनच्या काळात बालचित्रवाणीची आहे खरी गरज

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2020 4:18 AM

स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी नसल्याने खासगी कंपन्यांची मदत : दीक्षा अ‍ॅपबाबत शिक्षणतज्ज्ञांकडून प्रश्न उपस्थित

- सीमा महांगडे मुंबई: सद्यपरिस्थितीत ऑनलाईन शिक्षणासाठी राज्याची स्वतंत्र शैक्षणिक वाहिनी असावी आणि त्यावरून विद्यार्थ्यांना शैक्षणिक कार्यक्रमांतर्गत धडे दिले जावेत यासाठी शिक्षण विभागाची धडपड सुरु आहे. त्यासाठी एकीकडे आधीच केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाला पत्र पाठवून दूरदर्शन व रेडिओवर काही निश्चित तासांचा वेळ मागितला आहे. मात्र, केंद्राकडून त्याला काहीही प्रतिसाद न मिळालेला नाही.तर राज्याच्या स्वतंत्र शैक्षणिक वाहिनीचा प्रस्ताव ही लॉकडाऊनमुळे अडकून पडल्याची माहिती एससीईआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली. अशावेळी दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्मितीसाठी बालचित्रवाणीसारख्या संस्थेची राज्याला खरी गरज असल्याचे मत शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.आज राज्याकडे स्वत: ची स्वतंत्र शैक्षणिक नसल्याने तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहचविणे अवघड झाले आहे. त्यासाठी खासगी कंपन्यांकडून वाहिनी उपलब्ध करून घेण्याची वेळ शिक्षण विभागावर आली आहे.शिक्षण विभागाने जरी स्वतंत्र वाहिनी सुरु केली तरी त्यावरील शैक्षणिक साहित्याच्या दर्जाचे काय? दीक्षा अ‍ॅपवरील डिजिटल कन्टेन्ट वापरण्यात महाराष्ट्र आघाडीवर आहे. मात्र दीक्षा अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या साहित्याची पडताळणी संविधानाच्या नियमांत आणि चौकटीत बसणारी आहे का? विद्यार्थ्यांच्या संकल्पनाना वाव देणारे दर्जेदार काम यात झाले आहे का? असे प्रश्न शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांच्याकडून विचारण्यात आले आहेत. ज्याप्रमाणे पाठयपुस्तक निर्मितीसाठी तज्ज्ञ समिती , विषय अभ्यासक यांच्याकडून त्यांची तपासणी होते तशी या व्हिडीओची किंवा कन्टेन्टची तपासणी केली जाते का ? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.मुळात बालचित्रवाणी ही सरकारी संस्था होती. त्यामुळे डिजिटल साहित्य निर्मितीसाठी बालचित्रवाणीसारखी महत्त्वाची संस्था पुन्हा ताकदीने उभी करायला हवी, शासनाने त्यासाठी स्वतंत्र योजना बनवायला हवी असे मत शिक्षणतज्ज्ञ भाऊसाहेब चासकर यांनी व्यक्त केले. भविष्यात एससीईआरटी आणि बालचित्रवाणी सारख्या संस्था एकत्रित येऊन शैक्षणिक साहित्याची निर्मिती करत असतील तर ते विद्यार्थ्यांसाठी खरंच उपयुक्त ठरेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.संस्था बंद केल्याबाबत चौकशी करणारसध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डिजिटल एक्सेसची, डिजिटल कंटेंटविषयीची चर्चा सुरू आहे. मात्र जेव्हा देशातल्या अनेक राज्यांत आॅडिओ, व्हिडिओजचा वापर शिक्षणात होत नव्हता, तेव्हा बालचित्रवाणी संस्था मार्गदर्शक ठरत होती. ही संस्था का बंद करण्यात आली याची चौकशी करण्यात येईल असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या