मुंबई - धारावीत काम करणाऱ्या पालिकेच्या कर्मचाऱ्याला कोरोना झाल्यानंतर आता या परिसरातील एका वैद्यकीय कर्मचाऱ्याचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे येथील बाधितांची संख्या आता तीन झाल्यामुळे या परिसरात खळबळ उडाली आहे. देशातील या सर्वात मोठ्या झोपडपट्टीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने महापालिकेसमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे. धारावी येथे डॉ. बलिगा नगरमध्ये कोरोनामुळे एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर येथील अडीच हजार लोक वस्तीमध्ये प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही घटना ताजी असताना पालिका कर्मचाऱ्यापाठोपाठ आता धारावी मुख्य रस्त्यावरील इमारतीत राहणाऱ्या एका वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले आहे. वॉहकार्ड रुग्णालयात काम करणाऱ्या या ३५ वर्षीय वैद्यकीय कर्मचाऱ्याने खाजगी प्रयोगशाळेत चाचणी केल्यानंतर त्याला कोरोना ची लागण झाल्याचे आढळून आले आहे.
याबाबत पालिकेला माहिती मिळताच सदर वैद्यकीय कर्मचारी राहत असलेल्या धारावी मुख्य रस्त्यावरील १४ मजली इमारत सिल करण्यात आली आहे. या इमारतीमध्ये असलेले ४८ फ्लॅट्स आणि नर्सिंग होममध्ये गुरुवारपासून प्रवेश बंद करण्यात आला आहे. या सोसायटीमध्ये राहणाऱ्या तीनशे लोकांना बाहेर पडण्यास मनाई करण्यात आली आहे. तर बाहेरील व्यक्तींना आत प्रवेश देणे बंद केले आहे. तसेच कोरोना ची लागण होण्याचा धोका असलेल्या आतापर्यंत २५ लोकांची चाचणी करण्यात येत आहे.
धारावी मुख्य रस्त्यावरील सोसायटीत राहणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचे उजेडात आल्यानंतर येथील तीनशे लोकांना बाहेर जाण्यास मनाई करण्यात आली आहे. या परिसरातील ज्येष्ठ नागरिकांची यादी तयार करण्यात येत आहे त्याचबरोबर श्वसनाचा त्रास गंभीर आजार असलेल्या लोकांची चाचणी करण्यात येत आहे. कोरोनाचा धोका असलेल्या लोकांची चाचणी पूर्ण होईपर्यत या परिसरात जीवनावश्यक वस्तू, किराणा माल पोहचविण्याचे काम पालिकेमार्फत केले जाणार आहे. सदर वैद्यकीय कर्मचाऱ्यावर माहीम येथील रहेजा रुग्णालयात उपचार होत आहेत. तसेच त्याने परदेशात प्रवास केला होता का याची माहिती घेण्यात येत आहे. त्याचबरोबर तो राहत असलेल्या इमारतीचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.
धारावीत उपाययोजना...
सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत पालिकेचे दोन पथक, आठशे आरोग्य सेवक बरोबर जनजागृती व तपासणीचे काम करीत आहेत. मात्र या झोपडपट्टीतमध्ये तब्बल साडेआठ लाख लोक राहत असल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्याचे आव्हान पालिकेपुढे आहे.