मुंबई - बिहारमधील राष्ट्रीय जनता दलाचे आमदार सरोज यादव यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन करुन मुंबईत अडकलेल्या बिहारी नागरिकांची होत असलेली उपासमार लक्षात आणून दिली. यावेळी, उद्धव ठाकरेंनी अतिशय सौम्यपणे त्यांच्याशी संवाद साधला. तुम्ही काही काळजी करु नका, फक्त मला एखाद्या व्यक्तीचा नंबर द्या. त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याची जबाबादारी आमची, असे म्हणत स्वत: उद्धव ठाकरेंनी मोबाईल नंबर नोट करुन घेतला. उद्धव ठाकरेंचा हा संवाद सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यानंतर, आता महाराष्ट्रात अडकलेल्या त्या मजूरांना अन्नधान्य आणि जेवणाची साधनसामुग्री मिळाली आहे. विशेष म्हणजे स्वत: कलेक्टरच त्याठिकाणी हे साहित्य घेऊन पोहोचले होते.
कोरोना संकटाच्या काळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंमधील संवेदनशील आणि काळजीवाहू नेता प्रत्येकाने अनुभवला आहे. आपल्या भाषणावेळी ते सातत्याने महाराष्ट्राचा पालक असल्याचे सांगत आम्ही जबाबदारी घेतोय, तुम्ही खबरदारी घ्या, असे म्हणत नागरिकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करत आहेत. राज्यातील जनतेची काळजी घेण्यासोबतच, मुंबई आणि महाराष्ट्रात अडकलेल्या परराज्यातील नागरिकांच्या राहण्याची व जेवणाची सोय याकडेही ते जातीने लक्ष घालत आहेत. यासंदर्भात यापूर्वीही ते उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बिहारच्या नितीशकुमार यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला होता. दोन दिवसांपूर्वी बिहारच्या एका आमदाराने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच फोन करुन बिहारमधील कामगारांची होत असलेली उपासमार सांगितली. त्यानंतर, येथील गरजवंत कामगार अन् मजुरांना तात्काळ मदत मिळाली.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात जवळपास ६५० पेक्षा जास्त बिहारी कामगार अडकले आहेत. तर गुजरातमध्ये या मजूरांची संख्या हजारांमध्ये आहे. मुंबईतील ठाणे पूर्वेतील कोपरी पांखुरी परिसरात अडकलेल्या हरिवंशराय चौधरी यांनी मदत मिळाल्याचे सांगतिले. हरिवंशराय चौधरी हे मूळ भोजपूरच्या त्रिभुआनी सोहरा येथील रहिवाशी आहेत. आमदार सरोज यादव यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन झाल्यानंतर, येथील स्थानिक पोलीस आणि प्रशासनाकडून आम्हाला त्याचदिवशी मदत मिळाली. येथील जिल्हाधिकारी स्वत: धान्य अन् किराणा घेऊन आमच्याकडे आले होते. आता, पुढील १५ ते २० दिवस पुरेल एवढं धान्य आमच्याकडे आहे, असे चौधरी यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना म्हटलंय.
याशिवाय रायगड जिल्ह्यातील एका स्टील कंपनीत अडकलेल्या कामगारांसाठीही आमदार सरोज यादव यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मदत मागितली होती. तेथे जवळपास ४०० मजूर असून त्यांनाही अन्नधान्य पोहोचल आहे. दरम्यान, आमदार सरोज यादव यांनी फोन करुन गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी यांच्याकडेही कामगारांसाठी मदत मागितली होती. या कामगारांनही तेथील राज्य सरकारने मदत देऊ केली आहे.