मुंबई : कोरोना विषाणूमुळे सुरू असलेल्या लॉकडाउनदरम्यान सोशल मीडियाद्वारे व्हिडीओ, फोटो, घोषवाक्य अशा विविध माध्यमांतून सामाजिक संदेश देण्याचा अनेकांचा प्रयत्न दिसून येतो. असाच एक अनोखा प्रयत्न गोराई येथील कलाशिक्षक मनोहर बाविस्कर यांनी केला असून त्यांनी कोरोनाचे विघ्न दूर करण्यासाठी गणपतीकडे साकडे घालताना १० तासांमध्ये बाप्पाची तब्बल १ हजार ८० विविध रूपे रेखाटली आहेत.गोराई येथील प्रगती विद्यालयाचे कलाशिक्षक असलेले बाविस्कर यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना लॉकडाउनमुळे मिळणारा वेळ सत्कारणी लावण्याचा संदेशही दिला. बाविस्कर यांच्या कामगिरीची दखल ओएमजी बुक आॅफ रेकॉर्ड, इंडिया बुक आॅफ रेकॉर्ड, लिम्का बुक आॅफ रेकॉर्ड आणि महाराष्ट्र बुक आॅफ रेकॉर्ड या संस्थांनीही घेतली आहे. निर्धारित वेळेमध्ये एक हजाराहून अधिक गणपतीची चित्रे रेखाटण्याचा विक्रम अद्याप कोणीही केलेला नसल्याची माहिती या संस्थांकडून मिळाली.गुरुवारी (१४ मे) बाविस्कर यांनी सकाळी ९ वाजल्यापासून आपल्या उपक्रमाला सुरुवात केली आणि संध्याकाळी ७ वाजेपर्यंत त्यांनी बाप्पाची १,०८० विविध रूपे साकारली. यासाठी त्यांनी ए-४ साईज पेपर, मार्कर आणि स्केच पेन यांचा वापर केला. हा उपक्रम पूर्ण करण्यासाठी बाविस्कर यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सुनीता वाघ, सहकारी शिक्षकवर्ग, पत्नी ज्योती आणि मुलगा सुयश यांचे सहकार्य मिळाले.‘लोकमत’ बाप्पा : या उपक्रमादरम्यान मनोहर बाविस्कर यांनी खास ‘लोकमत’साठी गणपती बाप्पाचे सुंदर रूप साकारले. ‘लोकमत’ नावातून गणपतीची विविध रूपे साकारून बाविस्कर यांनी ‘लोकमत’च्या कार्याला मानवंदना दिली. ‘गेल्या २१ वर्षांपासून मी कलाक्षेत्रात कार्यरत आहे. सुट्टीच्या कालावधीमध्ये आपण काय करू शकतो हे शालेय विद्यार्थ्यांना कळावे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. तसेच कोरोनाचे विघ्न दूर होण्यासाठी गणपतीकडे या माध्यमातून प्रार्थना करण्याचा प्रयत्न आहे,’ असे बाविस्कर यांनी या वेळी सांगितले.