CoronaVirus: १०८ रुग्णवाहिकेत सेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचाऱ्यांचा जीव धोक्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 29, 2020 12:13 AM2020-03-29T00:13:52+5:302020-03-29T00:15:46+5:30
कोरोनाची लागण होण्याची दाट शक्यता
मुंबई – राज्यासह मुंबईतही कोरोनाची दहशत दिवसागणिक वाढतेय. या कोरोनाशी फ्रंटफूटवर लढणारे डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवक आपल्या जीवाची पर्वा न करता रुग्णसेवा करत आहे. परिणामी, अजूनही कोरोनाशी लढणाऱ्या या यंत्रणेतील सर्व घटकांच्या सुरक्षेचा विचार शासनाकडून होताना दिसत नाही. राज्यभरात कोरोना रुग्णांना उपचार देणाऱ्या अहोरात्र झटणाऱ्या १०८ रुग्णवाहिकांमधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि ड्रायव्हर (पायलट) यांचा कोणतीही सुरक्षेची साधने देण्यात आली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. परिणामी, हे सर्व डॉक्टर-कर्मचारी जीव धोक्यात घालून कोरोनाशी लढा देत आहेत, त्यामुळे शासनाने ही बाब लक्षात घेऊन यांना सुरक्षेचे कवच द्यावे अशी त्यांची मागणी आहे.
राज्यभरात आरोग्यसेवा क्षेत्रासाठी अतिशय गंभीर काळ सुरु आहे, अशा स्थितीत राज्यभरात सर्व जिल्ह्यात ९३७ इतकी १०८ रुग्णवाहिकांची संख्या आहे. या रुग्णवाहिकांमध्ये २२०० पायलट (रुग्णवाहिका ड्रायव्हर), १६०० डॉक्टर्स कार्यरत आहेत. तसेच, प्रत्येक १०८ रुग्णवाहिकेत एक डॉक्टर आणि एक रुग्णवाहिका चालक असे कार्यरत आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांकरता ही १०८ रुग्णवाहिका यापूर्वी जीवनदायी ठरलेली आहे. त्यामुळे रुग्णाला त्वरित आरोग्यसेवा मिळत आहे. मात्र रुग्णवाहिकाचे चालक आणि रुग्णांची चढ-उतार करण्या संबंधित त्याला रुग्णालयात दाखल करण्याचे महत्त्वाचे कार्य डॉक्टर करत आहे. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात या रुग्णवाहिकेचे कर्मचारी येत आहेत. मात्र त्यांना हँडग्लोव्हज, सॅनिटायझर्स, मास्क व पीपीई किट्स उपलब्ध नाहीत. वारंवार ही बाब शासनाच्या लक्षात आणून देखील यावर कोणतेही ठोस पाऊल उचलले नसल्याचे माथाडी श्रमिक कामगार संघर्ष युनियन (महाराष्ट्र) चे अध्यक्ष समीर करबेले यांनी सांगितले. तसेच, यातील बऱ्याचशा रुग्णवाहिका सतत नादुरुस्त असतात. यासबंधीत अनेक तक्रारी आरोग्य विभागाला करण्यात आल्या आहे. मात्र यावर शासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.
याविषयी, १०८ रुग्णवाहिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर शेळके यांनी सांगितले, सद्यस्थितीत मुंबई शहर उपनगरात ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांमधील २५ टक्के रुग्णवाहिकेला पीपीई किट्स देण्यात आली आहे. सध्या पीपीई किट्सची मागणी जास्त आहे, उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहोत.