मुंबई - दादर पश्चिम परिसरात आतापर्यंत तीन लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. शिवाजी पार्क येथे एका ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाला होता. त्यानंतर सोमवारी पोर्तुगीज चर्चशेजारील इमारतीत राहणाऱ्या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर मंगळवारी चितळे पथ येथील इमारतीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोना झाल्याचे समोर आले आहे.
दादर पश्चिम येथील पुरातन पोर्तुगीज चर्चशेजारी, एस. के. बोले मार्गावरील इमारतीमध्ये राहणाऱ्या महिलेला २४ मार्चपासून ताप येत होता. तिला टायफाईड झाल्याचे तिचे नातेवाईकांचे म्हणणे आहे. मात्र गेल्या शुक्रवारपासून श्वसनाचा त्रास होऊ लागल्यानंतर तिच्या नातेवाईकांनी तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल केले. मात्र खासगी प्रयोगशाळेत केलेल्या चाचणीत तिचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या परिसरातील दोन इमारती सील करण्यात आल्या आहेत.
या महिलेच्या संपर्कातील पाच नातलगांना हाय रिस्क ठरवून त्यांची चाचणी करण्यात येत आहे. या इमारतीमध्ये निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. तसेच या इमारतीमध्ये राहणाऱ्या अन्य रहिवाशांचीही चाचणी केली जाणार आहे. मंगळवारी चितळे पथ येथील एका इमारतीत राहणाऱ्या ६९ वर्षांच्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्या संपर्कातील पाच नातलगांची चाचणी केली जात आहे. सध्या त्यांना कस्तुरबा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे.
५४ वर्षीय महिलेला २४ मार्चपासून ताप येत होता. त्यानंतर २९ मार्चपासून तिला पोटात दुखणे व अतिसार होऊ लागले. त्यामुळे तिला अशक्तपणा आला होता. तिला टायफाईड झाल्याचे तिच्या नातेवाईकांचे म्हणणे आहे. ३ एप्रिल रोजी तिला श्वसनाचा त्रास होऊ लागला. त्यामुळे तिला हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. चितळे पथ येथील एका इमारतीत राहणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाला कोरोना ची लागण झाली आहे. त्यांची इमारत सील करण्यात आली असून त्यांच्या नातलगांची चाचणी सुरू आहे. दादर पश्चिम येथे कोरोना झालेले तिन्ही रुग्ण ज्येष्ठ नागरिक आहेत. विशेष म्हणजे या तिघांनी कुठेही बाहेरगावी प्रवास केलेला नाही. त्यामुळे कोरोनाची लागण त्यांना कशामुळे झाली? याचा शोध सुरू आहे.