मुंबई : जसलोकच्या सात नर्सना कोरोनाची लागण झाल्याचे धक्कादायक वृत्त असताना आता आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. प्रसुतीसाठी रुग्णालयात गेलेल्या महिलेला आणि तिच्या तीन दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाली आहे.
चेंबूर नाका येथील महिलेला २६ मार्चला एका खासगी रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल करण्यात आले होते. त्या महिलेची प्रसूती सिझेरियनद्वारे झाली. महिला बेशुद्ध असतानाच त्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना स्पेशल वॉर्ड खाली करण्यास सांगितला. हा वॉर्ड पालिकेने स्वच्छ करायला सांगितले असल्याचे कारण त्यांनी दिले. त्यामुळे नकार दिला नाही, असे या महिलेच्या पतीने सांगितले.
दुसऱ्या दिवशी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांच्या एका कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे उघड झाले. म्हणून आपणही पत्नीसह मुलाची खासगी लॅबमध्ये १३ हजार रुपये खर्च करून कोरोनाची चाचणी केली. त्यात पत्नी आणि ३ दिवसांच्या बाळाला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, असे या व्यक्तीने व्हिडिओत सांगितले. माझे लहान बाळ ३ दिवसाचे असल्याने त्याची जास्त काळजी घेण्याची गरज आहे. माझ्या बाळावर चांगले उपचार व्हावेत म्हणून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे' अशी मागणी बाळाच्या वडिलांनी केली आहे. दरम्यान या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही.
दरम्यान, जसलोक हॉस्पिटलमध्ये सात नर्सना कोरोनाची बाधा झाली आहे. काल एका नर्सला कोरोना झाल्याने खळबळ उडाली होती. दिवसागणिक मुंबईत कोरोनाची दहशत आणखीनच वाढली आहे. त्यात कोरोनाशी फ्रंटलाइनवर लढणाऱ्या डॉक्टर व आरोग्यसेविकांचाही जीव धोक्यात येत आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने ४० डॉक्टर व आरोग्य सेवकांच्या कोरोना चाचण्या केल्या आहेत. त्यातील मुंबईच्या प्रमुख रुग्णालयातील एका मोठ्या पदावर असणाऱ्या ज्येष्ठ डॉक्टरला कोरोनाची लक्षण दिसू लागली आहे, त्यामुळे त्यांना त्वरित अलगीकऱणास सांगितले आहे. या डॉक्टरकडे सेव्हन्स हिल्स रुग्णालयाच्या कोरोना केंद्राची प्रमुख जबाबदारी देण्यात आली होती. मुंबईत बुधवारी ३० कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे, तर सध्या शहर-उपनगरात एकूण १८१ कोरोना रुग्ण आहेत.
धारावीतही एक पॉझिटिव्हमुंबईतील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीतील ५६ वर्षांच्या पुरुषाला प्रवासाचा कोणताही इतिहास नसताना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच्या कुटुंबातील ७-८ सदस्यांना निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. सध्या हा रुग्ण सायन रुग्णालयात दाखल असून उपचार सुरु आहेत. मात्र प्रवासाचा इतिहास नसताना कोरोनाची लागण झाल्याने आता मुंबईपुढे कोरोनावर नियंत्रण मिळविण्याचे नवे आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे