मुंबई : रमजानच्या पवित्र महिन्यात रोजा (उपवासा)साठी लागणारे सामान पी उत्तर विभागाकडून मिळत नसल्याचा आरोप मालवणीतील सामाजिक संस्थेने केला होता. मात्र रमजानचे १५ रोजे संपत आले तरी अजूनही गरजू मुस्लीम बांधवांना इफ्तार साहित्य मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ ओढवली असून स्थानिक आमदार तसेच मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी यात हस्तक्षेप करत पालिकेच्या समाज विकास अधिकाऱ्या(सीडीओ)विरोधात कठोर पावले उचलावीत, अशी मागणी केली जात आहे.मालवणी परिसरात जवळपास साठ ते सत्तर टक्के मुस्लीम बांधव राहतात. ज्यांचे हातावर पोट असून लॉकडाउनमध्ये त्यांच्यावर बेरोजगारीची तलवार लटकत आहे. याच दरम्यान रमझानचा पवित्र महिना सुरू झाल्याने उपवासाचे साहित्य पुरविण्याची जबाबदारी पालिकेच्या प्रत्येक वॉर्डमधील समाज विकास अधिकाºयाची आहे. मात्र पाठपुरावा करूनही हे साहित्य मुस्लीम बांधवांना मिळत नसल्याने भर रमझानमध्ये त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. वंदे मातरम्सारख्या अनेक संस्थांकडून लोकांना धान्य तसेच उपवासाच्या साहित्याचे वाटप करण्यात येत आहे.मात्र मालवणीच्या जनतेसमोर त्यांनाही काही मर्यादा येत आहेत. त्यामुळे अन्नाची पाकिटे पालिकेने संस्थांकडे दिल्यास ती गरजूंपर्यंत पोहोचण्यात हातभार लागेल. त्यासाठी सुरू असलेले प्रयत्न मात्र सीडीओ महेंद्र गभनेसारखे अधिकारी फोल ठरवत आहेत. त्यामुळे निदान स्थानिक आमदार आणि मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी तरी यावर लक्ष द्यावे आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी विनंती करण्यात येत आहे. अन्यथा मालवणीच्या जनतेवर उपासमारीची वेळ ओढवणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे....तरीही मुस्लीम बांधवांचे हाल का?‘मालवणीचे आमदार आणि त्यांचे दोन नगरसेवक मुस्लीम आहेत. तरीदेखील रमझानसारख्या पवित्र महिन्यामध्ये मालवणीत मोठ्या संख्येने असलेल्या गरीब मुस्लिमांचे कोरोनासारख्या महामारीच्या काळात हाल होणे ही गंभीर बाब आहे. तसेच त्यांना जिंकवून देणाºया आमदारांना त्यांची काळजी नसल्याचेच यावरून उघड होत आहे.- हैदर आझम, भाजप उपाध्यक्ष, मुंबई
coronavirus: आमच्यावर उपासमारीची वेळ; आमदार साहेब, लक्ष द्या! इफ्तार साहित्य काही मिळेना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 10, 2020 4:47 AM