मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी जगभरातील सर्वच देशांमध्ये लॉकडाउन आहे. जपान आणि भारत या दोन्ही देशांमध्ये उत्तम उपाययोजना आखल्या जात आहेत. कोरोनाच्या समूळ उच्चाटनासाठी भारत सरकारने ज्या काही उपाययोजना केल्या आहेत, त्याबाबत भारत सरकारचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. जपानमधील टोकियो आणि भारतातील मुंबई ही दोन्ही शहरे कोरोनाला हरविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असून, नागरिकांनो घाबरून जाऊ नका. कारण टोकियो आणि मुंबईच नव्हे तर अवघे जग कोरोनाचे समूळ उच्चाटन करेल, असा विश्वास जपानचे मुंबईतील काउन्सिल जनरल मिचिओ हराडा यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
मिचिओ हराडा यांनी विविध विषयांवर आपली मते मांडली. ते म्हणाले, कोरोना विषाणू जगभरात पसरला आहे. जगभरात त्यावर नियंत्रण मिळविण्याचे काम सुरू आहे. भारतातदेखील कोरोना विषाणू पसरला आहे. जगातील इतर देशांच्या तुलनेत भारत सरकारने ज्या उपाययोजना हाती घेतल्या आहेत, त्याबाबत भारत सरकारचे कौतुक करावे तेवढेच कमीच आहे.
गेल्या ३० दिवसांहून अधिक काळात भारतात लॉकडाउन लागू करण्यात आले आहे. लॉकडाउन, कोरोनाचा परिणाम प्रत्येक देशावर, देशाच्या व्यवहारावर होत आहे. तसा तो भारत आणि जपानवरदेखील होत आहे. भारतात कार्यरत असलेले काही जपानी हब जपानला जाण्याच्या तयारीत आहेत. दोन्ही देशांनी या हबला आधार देण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी स्पष्ट केला.
सध्या आम्ही सगळे यात गुंतले आहोत. मुंबई ते जपान अशा होत असलेल्या व्यवहारात प्रत्येक घटकाला दिलासा मिळावा यासाठी आम्ही कार्यरत आहोत. कोरोनामुळे खूप अडचणी वाढल्या आहेत, हे मला माहीत आहे. मात्र, आम्ही सगळे सगळ्या प्रश्नांवर समाधानकारक उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. आपण या सर्वातून उत्तमरीत्या बाहेर पडू, असा उभय देशांना विश्वास असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.आणीबाणीसारखी अवस्थाजपानमध्येही सगळे काही सुरळीत आहे, असे मी म्हणणार नाही. तिथेही अवस्था फार काही उत्तम नाही. तिथेही आणीबाणीसारखी अवस्था आहे. संपूर्ण जपानमध्ये कोरोनाला नष्ट करण्याचा प्रयत्न सुरू आहे. लोक घराबाहेर पडत नाहीत, नियम पाळत आहेत, सरकारला मदत करत आहेत. सर्व देशांसमोर खूप मोठी आव्हाने उभी ठाकली आहेत. अर्थव्यवस्था कोलमडत आहेत. परिस्थिती बिकट आहे. मात्र, मला आशा आहे की, आपण कोरोनावर नियंत्रण मिळवू.जपानी नागरिकांना परत नेण्यासाठी प्रयत्नशीलजगभरात पसरलेल्या कोरोना विषाणूवर पुढील तीन महिन्यांत नियंत्रण मिळविता येईल का, या प्रश्नाचे उत्तर मी काय अन्य कोणीच देऊ शकणार नाही. सध्या मी मुंबईत आहे. मुंबईतदेखील कोरोनाशी लढा सुरू आहे. मुंबईत वास्तव्यास असलेल्या जपानी लोकांना जपानला जायचे आहे. मात्र, अनेक अडचणींमुळे ते शक्य होत नाही. आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करत आहोत. मुंबई ते जपान असे विशेष विमान उपलब्ध होते आहे का, ते तपासत आहोत. सरकार, विदेशी मंत्रालयाशी (फॉरेन मिनिस्ट्री) बोलणे सुरू आहे. आशा आहे की सगळे सुरळीत होईल, असे मिचिओ हराडा यांनी सांगितले.