Coronavirus : राज्यात कोरोनाचे एकूण ५२ रुग्ण, ४१ जणांची प्रकृती उत्तम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 07:23 AM2020-03-21T07:23:02+5:302020-03-21T07:23:38+5:30
कोरोनाबाधित ५ रुग्ण आजारमुक्त झाले असले, तरी चौदा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे.
मुंबई : राज्यात पिंपरी चिंचवड, पुणे येथे प्रत्येकी एक तर मुंबई येथे दोन, असे चार नवे रुग्ण आढळल्याने कोरोना रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. रुग्णालयातील कोरोनाच्या ४१ जणांची प्रकृती उत्तम असून, ८ जणांना सौम्य लक्षणे आहेत. कस्तुरबा रुग्णालयातील दोघांची प्रकृती गंभीर आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. देशात कोरोना रुग्णांची संख्या २२३ वर गेली आहे.
कोरोनाबाधित ५ रुग्ण आजारमुक्त झाले असले, तरी चौदा दिवसांचा विलगीकरणाचा कालावधी पूर्ण होईपर्यंत त्यांना रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर, चाचणी घेऊन घरी सोडण्याबाबत निर्णय घेतला जाईल.
मुंबईत शुक्रवारी आढळून आलेल्या दोन रुग्णांमध्ये एक ३८ वर्षीय तरुण तुर्कस्थानहून परतला असून, दुसऱ्या ६२ वर्षीय व्यक्तीने इंग्लंडमध्ये प्रवास केला आहे. पुण्यातील २० वर्षीय तरुण स्कॉटलंडला गेला होता, तर पिंपरी चिंचवडचा रुग्ण फिलिपिन्स व सिंगापूरहून परतलेल्या रुग्णाचा भाऊ आहे.
रुग्णांचा तपशील
पिंपरी चिंचवड - १२, पुणे - ९, मुंबई - ११, नागपूर - ४, यवतमाळ, नवी मुंबई, कल्याण प्रत्येकी - ३, अहमदनगर - २, रायगड, ठाणे, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी प्रत्येकी - १ । एकूण - ५२
१८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने विलगीकरण कक्षात १,३१७ जणांना
भरती करण्यात आले आहे. त्यापैकी १०३५ जणांचे प्रयोगशाळा नमुने निगेटिव्ह, तर ५२ जण पॉझिटिव्ह आले आहेत.