Join us

CoronaVirus: मुंबई-पुण्यात लॉकडाऊनचा फज्जा; सोशल डिस्टन्सिंगचा पुरता बोजवारा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 6:17 AM

मुंबई, पुण्यातल्या रस्त्यांवर दुचाकी, चारचाकींची वर्दळ

पुणे : कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण पुणे सील केले असले तरी लॉकडाऊनचा फज्जा उडाल्याचे चित्र आज दिसत होते. कोरोनाचे हॉटस्पॉट असलेल्या भवानी पेठेत आज सकाळी भाजी खरेदीसाठी दीडशे ते दोनशे लोकांनी गर्दी केली होती. यामध्ये सोशल डिस्टन्सिंगचा बोजवाराच उडाला होता. मुंबईसारख्या महानगरातही असे चित्र होते.पुण्यामध्ये लॉकडाऊननंतरही नागरिकांचे फिरणे कमी झालेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी संपूर्ण शहर सील केले. पुणे पोलीसांनी संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्याचे जाहीर केले. मात्र, तरीही शहरातील नागरिकांचे बाहेर फिरणे कमी झालेले नाही. संपूर्ण शहरातच हे चित्र आहे.दुचाकी, चारचाकींची वर्दळमुंबई : अर्थचक्राला चालना देण्यासाठी सोमवारपासून विविध उद्योगांना लॉकडाउनमध्ये सशर्त परवानगी देण्यात आली. मात्र, आवश्यक परवानग्या, सवलतींसाठी लागू करण्यात आलेल्या अटी व शर्तींची पूर्तता न झाल्याने पहिल्या दिवशी अनेक उद्योग-आस्थापना बंदच होत्या. नेहमीप्रमाणे किराणा, भाजीपाला आणि मेडिकल दुकाने तेवढी उघडी होती. विशेषत: दुचाकी आणि चारचाकी वाहनांची वर्दळ वाढल्याचे चित्र आज राज्यात होते.पुण्यात आज केंद्रीय पथकाने भेट दिली. विविध ठिंकाणी पाहणी करून प्रशासनासोबत बैठका घेतल्या. पुण्यातील परिस्थिती सुधारत नसल्यानेच केंद्रीय पथक आल्याची चर्चा होती. मात्र, पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी त्याचा इन्कार केला. ते म्हणाले, कोणत्याही आपत्तीमध्ये ज्या प्रमाणे केंद्राची समिती आढावा घेते त्याप्रमाणेच ही नियमित बैठक होती. पुण्यात करण्यात येत असलेल्या उपाययोजनांबाबत आणि कामाबाबत समाधान व्यक्त केले आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या