Coronavirus : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी तीन हजार वैद्यकीय कर्मचारी, विद्यार्थ्यांना प्रशिक्षण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 04:12 PM2020-04-11T16:12:58+5:302020-04-11T16:13:34+5:30
महापालिकेच्याच परिचारिका महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या ४६८ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ५४७ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यांना आवश्यक ते प्रशिक्षण बोरिवली येथील महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्रात देण्यात आले.
मुंबई - कोरोनाबाधित रुग्णांवर अधिक प्रभावी उपचार करता यावेत, यासाठी आपल्या वैद्यकीय सेवेतील मनुष्यबळ वाढविण्यासाठी महापालिकेच्या वैद्यकीय महाविद्यालयात आंतरवासिता (internship) करत असलेले ४१७ इंटर्न डॉक्टर्स, एमबीबीएसच्या चौथ्या वर्षाचे ६६२ विद्यार्थी आणि महापालिकेच्याच परिचारिका महाविद्यालयातील दुसऱ्या व तिसऱ्या वर्षांच्या ४६८ विद्यार्थिनी असे एकूण १ हजार ५४७ जणांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. यांना आवश्यक ते प्रशिक्षण बोरिवली येथील महापालिकेच्या नागरी प्रशिक्षण केंद्रात देण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये प्रामुख्याने 'कोरोना कोविड १९' विषयक रुग्णांवर उपचार करताना काय काळजी घ्यावी, उपचारांचा क्रम कसा असावा? व्हेंटिलेटरचा वापर केव्हा व कसा करावा? इत्यादीबाबत माहिती देऊन प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले जात आहे. या खेरीज आणखी १ हजार ७०९ डाॅक्टर्स, नर्सेस यांचे प्रशिक्षण महापालिकेच्या केईएम, नायर, टिळक व हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे वैद्यकीय महाविद्यालय या चार वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये / रुग्णालयांमध्ये आजपासून सुरू आहे. असे ३ हजार २५६ व्यक्तींचा समावेश असलेले अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध झाल्यामुळे 'कोरोना कोविड १९' बाधित रुग्णांना अधिक प्रभावी सेवा देणे शक्य होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि प्रशिक्षण घेत असलेल्या प्रशिक्षणार्थींना येणे-जाणे सोयीचे व्हावे, यासाठी बेस्ट बसेसची सुविधा महापालिकेद्वारे उपलब्ध करून देण्यात आली आहे.