मुंबई : कोरोनामुळे फिलिपाईन्स, मलेशिया या देशांतील विमानांचे भारतात आगमन रोखल्याचा फटका बसलेले विद्यार्थी गुरुवारी रात्री मुंबईत परतले. यामधील काहींनी मंगळवारी प्रवास सुरू केला. त्यांना मुंबईत पोहोचायला गुरुवार रात्र झाली.सिंगापूर विमानतळावर अडकलेले क्रिकेटपटू गौरव चव्हाण म्हणाले, १७ ला मनिलातून विमानाने क्वालालंपूरला पोहोचलो. तिथून पुढील विमान मिळण्यासाठी एक रात्र तिथे विमानतळावर काढावी लागली. तिथून सिंगापूरला पोहोचलो. मात्र एक रात्र थांबावे लागले. महाराष्ट्र सरकार व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सहकार्यामुळे व त्यांनी केलेल्या मदतीमुळे आम्हाला सिंगापूरमधून मुंबईला सुखरूप येणे शक्य झाले. विमानतळावर आम्हाला जेवण, नाष्टा व इतर सुविधा विनामूल्य पुरविण्यात आल्या. मनिला येथून मुंबईला येण्यासाठी तीन दिवस लागले.विमानतळावर येण्यासाठी कारमधून आम्ही निघालो होतो, मात्र सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आल्याचा फटका बसला. त्यामुळे तीन किमी अंतर सर्व सामान घेऊन चालावे लागले. अधिकाऱ्यांची विनवणी केल्यानंतर त्यांनी त्यांच्या वाहनातून आम्हाला विमानतळावर सोडले, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.मुंबईत विमानतळावर आमची वैद्यकीय तपासणी केली व त्यानंतर होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. आमच्या सोबत असलेले काही लहान विद्यार्थी रडत होते. या सर्व प्रसंगात आम्हाला प्रसारमाध्यमांची मोठी मदत झाल्याचे चव्हाण यांनी सांगितले.
Coronavirus : सिंगापूरमध्ये अडकलेले प्रवासी मायदेशी परतले
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 6:14 AM