मुंबई - मुंबईत कोरोना विषाणूचा प्रकोप वाढत आहे. आतापर्यंत मुंबईत जणांचा १८ मृत्यू झाला असून त्यात ६० वर्षांवरील रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे आता पालिका, राज्य सरकार व खासगी मोठ्या रुग्णालयात ६० वर्षांवरील रुग्णांवर उपचार केले जाणार आहेत. इतर रुग्णांवर मात्र मॅटरनिटी होम, गेस्ट हाऊस, हॉल आदी ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या विलगीकरण कक्षात उपचार केले जाणार असल्याची माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली आहे. याविषयी,पालिकेच्या आरोग्य विभागाने परिपत्रक काढले आहे.
दरम्यान, देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा ४९० वर पोहचला आहे. २६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यातील कोरोनाचं संकट वाढताना दिसत आहे. त्यामुळे राज्यातील काही भागात १४ एप्रिलनंतर लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत आरोग्यमंत्र्यांनी दिले आहेत. राज्यातील परिस्थिती पाहता लॉकडाऊन काही भागात वाढवलं जाऊ शकतं असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं आहे.
मात्र अद्याप याबाबत राज्य सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही. राज्यात कोरोनाग्रस्तांची वाढणारी संख्या सरकारची चिंता वाढवणारी आहे. अशातच आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीत कोरोनाचे ३ रुग्ण आढळून आल्याने खळबळ माजली आहे. धारावीत कोरोनाचं संक्रमण वाढलं तर कोरोनाग्रस्तांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यानंतर हे रोखणं सरकारसमोर आव्हान असणार आहे. त्याचसोबत मुंबईत सीआयएसएफच्या ६ जवानांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
शुक्रवारी मुंबईत कोरोनाचे ४३ नवीन रुग्ण आढळून आले. मागील २४ तासांत ६ रुग्णांचा जीव गेला आहे. आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या २६ इतकी झाली आहे. त्याचसोबत उपचारानंतर डॉक्टरांनी ५० रुग्णांना कोरोनामुक्त झाल्याचं सांगितलं आहे. मुंबईत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली आहे. मुंबईची लोकसंख्या अधिक आहे. महापालिकेने शहरातील काही भाग कोरोना प्रभावित जाहीर केले आहेत. या परिसरातून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत.