Coronavirus: मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार; सायन रुग्णालयातील धक्कादायक व्हिडीओ व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2020 03:26 AM2020-05-08T03:26:24+5:302020-05-08T03:26:45+5:30
कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांशी वारंवार संपर्क साधूनही ते मृतदेह नेण्यास येत नाहीत
मुंबई : सायन रुग्णालयातील एका वॉर्डमध्ये काही मृतदेह ठेवण्यात आले होते. त्यांच्या शेजारीच रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार एका व्हिडीओच्या माध्यमातून समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ‘लोकमत’कडे या वॉर्डची छायाचित्रे आहेत; परंतु ती प्रसिद्ध करण्यासारखी नाहीत. दरम्यान, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी समिती गठित करण्यात आली आहे. २४ तासांत त्याचा अहवाल मागविण्यात आल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले.
सायन रुग्णालयातील कोरोना वॉर्डमध्ये प्लास्टीकच्या आवरणामध्ये हे मृतदेह लपेटून ठेवले असून, या मृतदेहांशेजारील खाटांवर कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, त्यांचे नातेवाईक, डॉक्टर, नर्स फिरत असल्याचे ‘त्या’ व्हिडीओत दिसते. तासन्तास हे मृतदेह वॉर्डमध्ये पडलेले असल्याने त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या इतर रुग्ण तसेच नातेवाइकांना संसर्ग होण्याची भीती व्यक्त होत आहे. सध्या मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यात वैद्यकीय कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची बाधा होत आहे. कमी मृतदेहांशेजारीच रुग्णांवर उपचार
कर्मचारी असल्यामुळे हे मृतदेह पडून राहिले होते का, असा सवाल विचारण्यात येत आहे. यापूर्वी केईएम, कूपरसारख्या रुग्णालयात असेच कोरोनाबाधित रुग्णांचे मृतदेह पडून असल्याच्या घटना ताज्या असतानाच आता सायन रुग्णालयातही मृतदेह पडून असल्याचा प्रकार समोर आल्याने पालिका रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर पुढील प्रक्रियेत दुर्लक्ष केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
भाजप नेते आमदार नितेश राणे यांनी हा व्हिडिओ टष्ट्वीट करून आरोग्य विभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. बुधवारी रात्री हा व्हिडिओ टष्ट्वीट केला होता. मात्र, त्यावेळी सायन रुग्णालय प्रशासनाने याची जबाबदारी घेण्यास नकार दिला; परंतु गुरुवारी सकाळी हा व्हिडिओ सायन रुग्णालयातीलच असल्याची कबुली दिली. एका डॉक्टरच्या मते याआधी असाच प्रकार नायर हॉस्पिटलमध्येही घडला होता. त्याठिकाणीदेखील ज्याठिकाणी रुग्णांवर उपचार सुरू होते त्याठिकाणी जवळपास २० मृतदेह ठेवलेले होते. गुरुवारी सायनमधील प्रकार उघडकीस आल्यानंतर ते मृतदेह हलविण्यात आले. मुंबईत १० हॉस्पिटल्समध्ये ४४० मृतदेह ठेवण्याची सोय आहे.
कोरोनाबाधित रुग्णाच्या मृत्यूनंतर त्याच्या नातेवाईकांशी वारंवार संपर्क साधूनही ते मृतदेह नेण्यास येत नाहीत. तसेच अनेकदा पोलिसांच्या प्रक्रियेत विलंब होतो. त्यामुळे मृतदेह वॉर्डामध्ये ठेवावे लागतात. शवागारात कोरोनामुळे मृत्यू झालेले केवळ १५ मृतदेह ठेवता येतात. ते शवागारात नेल्यानंतरही नातेवाईक येतील, याची खात्री नसते. सध्या रुग्णालयातील सर्व मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले असून, रुग्णालयात एकही कोरोना पॉझिटिव्ह मृतदेह नाही. -डॉ. प्रमोद इंगळे, अधिष्ठाता, सायन रुग्णालय