मुंबई: राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वेगानं वाढत आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. आशियातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धारावीत आज कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला. काल रात्रीच धारावीत कोरोनाचा एक रुग्ण सापडला होता. यानंतर आता पुन्हा एक रुग्ण आढळून आल्यानं धारावीतल्या कोरोनाग्रस्तांची संख्या २ वर गेली आहे. आज आढळून आलेला कोरोनाचा रुग्ण सफाई कर्मचारी असल्याची माहिती मिळाली आहे. या व्यक्तीचं वय ५४ वर्ष आहे.आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेला रुग्ण वरळीचा रहिवासी असल्याचं समजतं. ही व्यक्ती धारावीच्या माहिम फाटक रोड परिसरात काम करते. विशेष म्हणजे ही व्यक्ती मुंबई महापालिकेशी संबंधित असल्यानं चिंतेत आणखी वाढ झाली आहे. या व्यक्तीमध्ये तीन-चार दिवसांपासून कोरोनाची लक्षणं दिसत होती. गुरुवारी ही व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली, अशी माहिती डॉक्टरांनी दिली.काल धारावीत कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. एका ५६ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली. या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानं स्थानिकांची चिंता वाढली आहे. यानंतर प्रशासनानं नऊ सोसायट्या पूर्णपणे सील केल्या आहेत. यामध्ये २ हजार लोक राहतात. सध्या या सगळ्यांना क्वॉरेंटाईन करण्यात आलं असून लवकरच त्यांची कोरोना चाचणी केली जाईल, अशी माहिती प्रशासनानं दिली.
CoronaVirus: धारावीत २४ तासांत सापडले कोरोनाचे दोन रुग्ण; सफाई कर्मचाऱ्याला लागण
By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2020 3:03 PM