मुंबई : राज्यात सोमवारी कोरोनाच्या १७ नवीन रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णसंख्या २२० झाली आहे. या नवीन रुग्णांमध्ये ८ रुग्ण मुंबईचे असून ५ रुग्ण पुण्याचे, २ नागपूरचे, तर नाशिक आणि कोल्हापूर येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, सोमवारी दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. सध्या राज्यात १७१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
राज्यात एकूण ३२८ जण विविध रुग्णालयांत भरती झाले आहेत. १८ जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत ४५३८ जणांना भरती करण्यात आले. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी ३८७६ जणांचे प्रयोगशाळा नमुने करोनाकरिता निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात १९ हजार १६१ व्यक्ती घरगुती अलगीकरणात असून १२२४ जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबई व पुण्यात दोन बळी
राज्यात दोन कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला. एका ८0 वर्षीय पुरुषाचा मुंबईतील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना उच्च रक्तदाब आणि हृदयरोग हे इतर आजारही होते, तर कोरोना बाधित ५२ वर्षीय पुरुषाचा पुण्यातील खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांना मधुमेह व उच्च रक्तदाबाचा त्रास होता. राज्यातील कोरोना बाधित मृत्यूची संख्या १० झाली आहे. मुंबई येथील आणखी काही रुग्णांचे नमुना तपासणी अहवाल न मिळाल्याने त्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही.