coronavirus: अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी परिस्थिती पाहूनच घेणार निर्णय - उदय सामंत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 07:21 AM2020-05-12T07:21:36+5:302020-05-12T07:22:06+5:30

अनेक स्वायत्त आणि खासगी विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी या वेळी केल्या.

coronavirus: Uday Samant will take a decision on the final session exams on June 20 after looking at the situation | coronavirus: अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी परिस्थिती पाहूनच घेणार निर्णय - उदय सामंत

coronavirus: अंतिम सत्रातील परीक्षांबाबत २० जून रोजी परिस्थिती पाहूनच घेणार निर्णय - उदय सामंत

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या संसर्गाबाबत २० जून रोजी पुन्हा आढावा घेऊन त्यानंतरच अंतिम वर्षाच्या अंतिम सत्रातील परीक्षा घ्यायच्या की नाहीत, याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी विद्यार्थ्यांना दिली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांच्या नवमहाराष्ट्र युवा अभियानातर्फे आयोजित राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे आगामी शैक्षणिक वर्ष व समस्या या विषयावर त्यांनी फेसबुकद्वारे संवाद साधला.
अनेक स्वायत्त आणि खासगी विद्यापीठे विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याच्या तयारीत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी या वेळी केल्या. त्यावर आपण उद्याच सर्व विद्यापीठांच्या प्रशासन आणि कुलगुरूंशी संवाद साधणार आहोत. यूजीसीच्या निर्देशांप्रमाणे, राज्य शासनाच्या धोरणानुसारच स्वायत्त, खासगी विद्यापीठांना परीक्षांबाबतचे धोरण राबवावे लागेल. याबाबत लवकरच निर्णय जाहीर करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
ज्या विद्यार्थ्यांनी शुल्क भरले आहे, मात्र परीक्षा झाली नाही त्यांच्या शुल्काबाबत काय निर्णय घ्यावा, यासंदर्भात येत्या २ दिवसांत राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून निर्णय जाहीर करण्यात येईल, असेही ते म्हणाले.
अंतिम सत्रातील ज्या विद्यार्थ्यांच्या बॅकलॉगच्या परीक्षा बाकी आहेत, त्यांना १ ते ३० जुलैदरम्यान या परीक्षांच्या दरम्यानच त्या द्याव्या लागतील. विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी, परीक्षेत मदत व्हावी यासाठीही विद्यापीठांच्या कुलगुरूंशी चर्चा करून येत्या २ दिवसांत निर्णय घेण्यात येईल. सीईटी रद्द केल्यास लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य धोक्यात येऊ शकते, अशी माहिती त्यांनी सीईटी रद्द करा या विद्यार्थ्यांच्या मागणीला उत्तर देताना दिली. तसेच यंदा सीईटी जिल्हास्तरावर घेण्याऐवजी तालुकास्तरावर घेण्याचे नियोजन करत असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र हे उच्च व तंत्रशिक्षण परीक्षांच्या बाबतीत निर्णय घेणारे पहिले राज्य असून इतर अनेक राज्ये हेच धोरण फॉलो करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

भविष्यात आॅनलाइन शिक्षण

भविष्यात आॅनलाइन शिक्षणासाठी उच्च व तंत्रशिक्षण विभाग प्रयत्नशील राहणार असल्याचे उदय सामंत यांनी म्हटले. अनेक विद्यापीठे यादृष्टीने पावले उचलत असून काही आॅनलाइन स्टुडिओ उभारून व्हर्चुअल लेक्चर्स कसे घेता येतील, आपले सॅटेलाइट चॅनेल कसे सुरू करता येईल यादृष्टीने प्रयत्न करत असल्याचे सांगितले. नेट कनेक्टिव्हिटीचा अडथळा लक्षात घेता ग्रामीण विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी व्हर्च्युअल रूपात आॅनलाइन क्लासेसचा प्रयत्न राहील, असे त्यांनी सांगितले.

Web Title: coronavirus: Uday Samant will take a decision on the final session exams on June 20 after looking at the situation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.