मुंबई - महाराष्ट्र दिन आणि राज्यावर आलेल्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्यातील जनतेला संबोधित केले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी ३ मे रोजी लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यातील जनतेला काही प्रमाणात मोकळीक देण्याची घोषणा केली. तसेच कोरोनाविरोधात लढण्यासाठी सरकारकडून सुरू असलेल्या प्रयत्नांबाबत माहिती देतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोनाविरोधातील लढ्यात सक्रिय सहभाग घेणाऱ्या दोन महापौरांचा आवर्जुन उल्लेख केला.उद्धव ठाकरे म्हणाले की, ''मुंबई महानगरपालिकेच्या महापौर किशोरी पेडणेकर तसेच कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर विनिता राणे या दोघी परिचारिका असून, त्या या आपत्कालीन परिस्थितीत सेवा देण्यास पुढे आल्या आहेत. याप्रमाणेच खासगी डॉक्टरांनीही पुढे यावे,'' असे आवाहनही त्यांनी केले.दरम्यान, कोरोनाला नमवण्यासाठी आयुष मंत्रालयाची, होमियोपॅथीची मदत घेत असल्याचे सांगून मुख्यमंत्र्यांनी टास्कफोर्समधील डॉक्टर्स इतर डॉक्टरांना मार्गदर्शन करत आहेत, त्यातून उपचाराची दिशा निश्चित होत आहे, संपूर्ण राज्यात यंत्रणा अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहे, अशी माहिती ही त्यांनी दिली. डॉक्टर, नर्सेस, पोलीस हे आपल्यासाठी देव आहेत, त्यांच्यावरचा ताण न वाढवता त्यांना आतापर्यंत दिले तसेच पुढेही सहकार्य करा असे आवाहन ही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केले. दरम्यान, राज्यात ३ मे नंतर कोरोनाला रोखण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत महत्त्वपूर्ण घोषणा करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ह्य 3 तारखेपर्यंत लॉकडाऊन आहे पुढे काय? अशी विचारणा केली जात आहे. 3 तारखेनंतर काय करणार, असे विचारले जात आहे. आता लॉकडाऊनमुळे राज्याचे अर्थचक्र रुतले आहे. पुढच्या काळात बेकारी वाढणार. अशी भीती व्यक्त केल जात आहे. हे थोडंसं खरं आहे. नाही असं नाही. पण प्रत्येक राष्ट्राची आणि राज्याची खरी संपत्ती जनता. तिला प्राथमिकता द्यायला हवी. नागरिक वाचले तर हा गाडा चिखलातून काढून पुढे नेऊ शकतो,ह्ण असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.आता तीन तारखेनंतर लॉकडाऊनमधून अधिक मोकळीक देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. मात्र ही मोकळीक रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनप्रमाणे देण्यात येईल, पण ही मोकळीक घाई-गडबड न करता देणार आहोत. लॉकडाऊनमुळे सगळ्यांचीच कामं अडली आहेत, पण ती सुरू करताना आत्तापर्यंत केलेली तपश्चर्या व्यर्थ व्हायला नको. आयुष्याची गाडी धीराने, खंबीरपणे पूर्वपदावर आणायची आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.