coronavirus: परीक्षांसाठी विद्यापीठे होत आहेत सज्ज! काहींचा आराखडा तयार; काहींना शासन आदेशाची प्रतीक्षा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2020 06:00 AM2020-08-30T06:00:53+5:302020-08-30T06:01:27+5:30
राज्यातील विविध विद्यापीठांच्या अधिकारी, कुलसचिव व समन्वयकांशी बोलून विद्यापीठांची परीक्षांसाठी काय तयारी आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला थोडक्यात आढावा :
मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा होणारच, या निर्णयावर शिक्कामोर्तब केले आहे. मात्र, अपुऱ्या सोयीसुविधा, मनुष्यबळ, इंटरनेट कनेक्टिव्हिटी यामुळे विद्यापीठ प्रशासनाला कोविड काळात परीक्षा नियोजनात अडचणी येणार आहेत. मात्र आता परीक्षा घ्यायच्याच म्हटल्यावर राज्यातील विद्यापीठांनी त्यादृष्टीने तयारी सुरू केली आहे. राज्यातील विविध विद्यापीठांच्या अधिकारी, कुलसचिव व समन्वयकांशी बोलून विद्यापीठांची परीक्षांसाठी काय तयारी आहे, याचा ‘लोकमत’ने घेतलेला थोडक्यात आढावा :
मुंबई विद्यापीठ
मुंबई विद्यापीठाकडून पदविका, पदवीपूर्व आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या १५८ परीक्षांसाठी सुमारे २ लाख २२ हजार ५८१ विद्यार्थी बसणार आहेत. मुंबई विद्यापीठाकडून तयार करण्यात येणाºया कृती आराखड्यानुसार ग्रेडिंग पॅटर्न, एटीकेटी, दूर व मुक्त अध्ययन संस्थेतील वार्षिक परीक्षा पद्धतीनुसार प्रविष्ट झालेले विद्यार्थी, महाविद्यालयांच्या शंकांचे निरसन करून, निर्णय घेतला जाणार आहे.
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर
अंतिम सत्रातील २२५ परीक्षा होतील. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील एकूण ७५ हजार विद्यार्र्थ्यांना परीक्षा द्यावी लागेल.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ, पुणे
आॅनलाइन परीक्षेला प्राधान्य दिले जाण्याची शक्यता आहे. आॅफलाइन परीक्षेचीही चाचपणी केली जाईल. किमान दीड महिन्याचा कालावधी लागेल. येथे परीक्षा देणाऱ्यांची संख्या सुमारे सव्वादोन लाख आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ, नागपूर
आॅफलाइन परीक्षेची तयारी ९० टक्के झाली आहे. शासनाचे दिशानिर्देश आले की वेळापत्रक तयार करण्यात येईल.
गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली
परीक्षा घेण्याचे नियोजन पूर्ण झाले असून केवळ शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी दिली. या विद्यापीठांतर्गत एकूण १८० महाविद्यालये येतात. १५ हजार विद्यार्र्थ्यांची परीक्षा घ्यायची आहे. मागील वर्षी ६५ परीक्षा केंद्रे होती. यंदा केंद्रांची संख्या दुप्पट केली जाणार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद
येथे आॅफलाइन परीक्षा घेण्यात येईल. याविषयीचा कृती आराखडा चार दिवसांत सादर केला जाईल. पदवीच्या अंतिम वर्षाला ७० हजार विद्यार्थी असून, परीक्षेचा कालावधी वाढवून मागण्यात येणार आहे.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ
या विद्यापीठांतर्गत परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर या जिल्ह्यातील जवळपास २०० महाविद्यालयांतील पदवी अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षातील साडेपंधरा हजारांहून अधिक विद्यार्थी परीक्षा देतील. कुलगुरू डॉ. उद्धव भोसले यांनी बैठक घेऊन परीक्षेसंदर्भात पूर्वनियोजन केले. आॅफलाइन परीक्षा घेण्यासंदर्भात नियोजन करण्यात आले आहे.
विद्यापीठांची होणार दमछाक!
राज्यातील १३ अकृषी विद्यापीठांपुढे अंतिम सत्राच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आव्हान आहे. यूजीसीच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राज्यातील विद्यापीठे आॅनलाइन, आॅफलाइन किंवा संमिश्र पद्धतीचा अवलंब परीक्षांसाठी
करू शकतील. मात्र राज्यातील सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीमध्ये एकसमानता आणणे कठीण असून सध्या राज्यातील कोरोनाची परिस्थिती पाहता प्रत्येक विद्यापीठ आपापल्या स्तरावर निर्णय घेतील, या सर्व नियोजनाला वेळ लागेल, अशी शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.
जेथे आॅनलाइन परीक्षा घेणे अडचणीचे ठरेल त्या विद्यापीठांमध्ये साहजिकच फिजिकल डिस्टन्सिंग ठेवून त्यांची प्रत्यक्ष पेन व पेपर पद्धतीने परीक्षा घ्यावी लागेल. त्यामुळे साधारणत: २ सत्रांत होणाºया परीक्षांची संख्या ३ सत्रांतही होऊ शकते. याशिवाय सद्यपरिस्थितीत जो कर्मचारी १० टक्क्यांवर कार्यरत आहे त्याची क्षमता १०० टक्के करावी लागेल.