मुंबईत दुकाने 10 पर्यंत खुली, लोकल वाहतूक तूर्त बंदच! ठाण्याचा निर्णय आज; रायगड, पालघरमधील निर्बंध कायम
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2021 07:51 AM2021-08-03T07:51:50+5:302021-08-03T07:52:58+5:30
Coronavirus Unlock in Maharashtra: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत.
मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार पूर्णपणे नियंत्रणात आल्यामुळे मुंबईत ब्रेक दि चेन अंतर्गत निर्बंधातील काही अटी शिथिल करण्यात आले आहेत. त्यानुसार सर्व दुकाने व आस्थापना आठवड्याचे सर्व दिवस रात्री दहा वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र, लोकल सेवा सुरू होण्यासाठी मुंबईकरांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. याबाबत महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी सोमवारी सुधारित परिपत्रक जारी केले.
मुंबईत सध्या रुग्ण पॉझिटिव्हिटीचा दर १.७६ टक्के, तर ऑक्सिजन खाटांच्या व्याप्तीचा दर १८.७६ टक्के इतका आहे. त्यामुळे सध्या मुंबईत लेव्हल-३ च्या निर्बंधात मंगळवारपासून शिथिलता आणण्यात आली आहे. मात्र, लोकल सेवा, खासगी कार्यालये, मॉल, चित्रपटगृह यामध्ये कोणतीही शिथिलता देण्यात आलेली नाही. सध्या चार वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची मुभा असलेल्या दुकानांच्या वेळेमध्ये वाढ करून देण्याची मागणी मंजूर करण्यात आली आहे.
कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असल्याने मुंबईतील निर्बंध मंगळवारपासून काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय महापालिकेने रात्री उशिरा घेतला. मात्र महानगर क्षेत्रातील अनेक भागांत रूग्णसंख्या घटत नसल्याने लोकल वाहतूक तूर्त बंदच राहणार आहे. लसींचे दोन डोस घेतलेल्यांना लोकल प्रवासासाठी परवानगी देण्याबाबत सरकार लवकरच निर्णय घेईल, अशी माहिती राज्य सरकारतर्फे सोमवारी न्यायालयात मांडण्यात आली.
ठाण्यातील निर्बंध शिथिल करण्याबाबत मंगळवारी निर्णय घेतला जाणार आहे. मात्र नुकताच पुराचा तडाखा बसलेल्या रायगड, पालघर जिल्ह्यात रूग्णवाढ कायम असल्याने तेथील सध्याचे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत.
मुंबईची लोकल सामान्य प्रवाशांसाठी बंद राहील, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. टप्प्याटप्प्याने निर्बंध कमी केले जातील. त्यातून होणाऱ्या फायद्या-तोट्यांचा अभ्यास करून निर्बंध शिथिल करायचे की, वाढवायचे याचा निर्णय होईल. आता मोकळीक दिली याचा अर्थ आपण कसेही वागू शकतो असे नाही असे सांगून ठाकरे लोकमतशी बोलताना ठाकरे म्हणाले, लोकांना निर्बंध पाळावे लागतील. मास्कशिवाय बाहेर फिरता येणार नाही. ही मोकळीक कायम मिळू द्यायची असेल तर आपल्याला विना मास्क फिरता येणार नाही, याची सगळ्यांनी जाणीव ठेवावी.
मुंबईत दुकाने, हॉटेलांना सवलती : कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, अहमदनगर, बीड, रायगड आणि पालघर या ११ जिल्ह्यांमध्ये रुग्णांचे प्रमाण जास्त असल्यामुळे निर्बंध कायम ठेवण्यात आले आहेत. मुंबईत दुकानांची वेळ रात्री दहापर्यंत, हॉटेलांची दुपारी चारपर्यंत वाढविण्यात आली आहे. ठाण्यातील निर्णय मंगळवारी घेतले जाणार आहेत.
अन्य २२ जिल्ह्यांना कोणत्या सवलती?
हे राहणार सुरू
-अत्यावश्यक व इतर सर्व प्रकारची दुकाने आणि मॉल सोमवार ते शुक्रवार रात्री आठ वाजेपर्यंत आणि शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी जनता कर्फ्यू असेल.
- उद्याने, व्यायाम शाळा, खेळाची मैदाने, व्यायाम, चालणे, धावणे, सायकलिंगसाठी खुली असतील.
- शासकीय व खासगी कार्यालय १००% क्षमतेने सुरू राहतील. कार्यालयात जाण्यासाठी एकाच वेळी गर्दी होऊ नये म्हणून वेळा ठरवून घ्याव्या.
- वर्क फॉर्म होम पद्धतीने काम करणाऱ्यांना मुभा
- शेतीविषयक सर्व दुकाने, बांधकाम, उद्योग, वाहतूक यंत्रणा पूर्ण क्षमतेने चालू राहतील.
- जिम, योगा सेंटर, हेअर कटिंग सलुन, ब्युटी पार्लर, मसाज पार्लर ५० टक्के क्षमतेने रात्री आठ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवारी दुपारी तीनपर्यंत सुरू राहतील, मात्र त्यांना एसी वापरता येणार नाही.
काही बंधने कायम
- शाळा, महाविद्यालये, तंत्र महाविद्यालय यांच्यासाठी शालेय शिक्षण व उच्च व तंत्रशिक्षण विभागाने काढलेले आदेश लागू राहतील.
- हॉटेल, रेस्टॉरंट्समध्ये बसून जेवण करता येईल मात्र त्यासाठी ५० टक्के उपस्थिती बंधनकारक असेल तसेच सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी असेल. पार्सल व्यवस्था पूर्वीच्या आदेशाप्रमाणे कायम असेल.
- रात्री ९ ते सकाळी ५ वाजेपर्यंत पूर्वीप्रमाणेच बंधने कायम
- वाढदिवस, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, रॅली, मोर्चे, आंदोलने आदींवर पूर्वीप्रमाणेच बंधने
- कोविड प्रोटोकॉल म्हणजेच मास्क वापरणे, हँड सॅनिटायझर वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टींचे तंतोतंत पालन करावे लागेल. पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल.
हे मात्र बंद
- चित्रपटगृह, नाट्यगृह, मल्टिप्लेक्स पुढील आदेश येईपर्यंत बंद राहतील.
- मॉलमधील चित्रपटगृहे देखील पुढील आदेशापर्यंत बंद राहतील.
- सर्व धार्मिक स्थळे बंद राहतील.
खासगी कोचिंग क्लासेसला मुभा द्या
५० टक्के उपस्थितीत खासगी कोचिंग क्लासेस चालविण्यास मुभा द्यावी, अशी मागणी पालक करीत आहेत. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये, असे पालकांचे म्हणणे आहे.