मुंबई: कोरोनाग्रस्तांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्यानं संसर्ग टाळण्यासाठी मुंबईतील लोकल वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी चर्चा सकाळपासून सुरू होती. या चर्चेला अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी पूर्ण पूर्णविराम दिलाय. मुंबईची लाईफ लाईन असलेली लोकल सेवा बंद करण्यात येणार नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटच्या बैठकीनंतर सांगितलं. लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा. गर्दी कमी करावी. अन्यथा आम्हाला इच्छा नसतानाही कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मुंबईतील लोकल आणि बस सेवा बंद करण्यात येणार असल्याची चर्चा सकाळपासून सुरू होती. याबद्दलचा निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीतच होऊ शकतो, असं आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी दुपारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत म्हटलं होतं. त्यामुळे मुंबईकरांचं लक्ष मंत्रिमंडळ बैठकीकडे लागलं होतं. मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेट बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना असा कोणताही निर्णय घेतला नसल्याचं स्पष्ट केलं. मुंबईतील लोकल आणि बस सेवा बंद करण्याचा सरकारचा विचार नाही. मात्र लोकांना अनावश्यक प्रवास टाळावा. अन्यथा इच्छा नसतानाही आम्हाला कठोर पावलं उचलावी लागतील, असं मुख्यमंत्री म्हणाले. राज्यात सध्या ४० जणांना कोरोनाची बाधा झाली असून त्यातल्या एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिली. कोरोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. तर ४० रुग्णांमध्ये २६ पुरुष आणि १४ महिलांचा समावेश आहे. यातल्या एकाचा अपवाद वगळल्यास इतरांची प्रकृती स्थिर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. लोकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणं टाळावं, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा केलं.जीवनावश्यक वस्तूंची दुकानं सुरू राहावीत. मात्र इतर वस्तूंची दुकानं बंद करावीत, अशी विनंती त्यांनी दुकानदारांना केली. दर्शनासाठी मंदिरं बंद ठेवण्याचा निर्णय घेणाऱ्या सिद्धीविनायक, शिर्डी देवस्थान समित्यांचे यावेळी त्यांनी आभार मानले. सरकारी कर्मचाऱ्यांना आठवडाभर सुट्टी देण्यात आलेली नाही. सरकारी कार्यालयं सुरुच राहतील, हेदेखील त्यांनी स्पष्ट केलं.
Coronavirus: मुंबईतील लोकल सेवा सुरुच राहणार; लाईन लाईन बंद करण्याच्या चर्चेला मुख्यमंत्र्यांचा पूर्णविराम
By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2020 6:33 PM
लोकांनी अनावश्यक प्रवास टाळावा; अन्यथा नाईलाजानं कठोर पावलं उचलावी लागतील- मुख्यमंत्री
ठळक मुद्देमुंबईतील लोकल सेवा सुरुच राहणार; मुख्यमंत्र्यांची माहितीलोकांनी अनावश्यक प्रवास टाळा; मुख्यमंत्र्यांचं आवाहनलोकल, बस सेवा बंद होणार असल्याची सकाळपासून होती चर्चा