मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार २२५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १५४ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ५ हजार ५५७ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे. राज्यात आजपर्यंत एकूण ६२ लाख १४ हजार ९२१ कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.
राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.९३ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,१७,१४,९५० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,११,५७० (१२.४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,२९,०४७ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २६१४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात २८३ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर २०३ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,१९,१५८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात ५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २७६० सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर २०५४ दिवसांवर गेला आहे.
मुंबईच्या पोद्दार रुग्णालयात ऑक्सिजन प्रकल्प-
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविण्यात येत असल्याने महापालिकेने सर्व वैद्यकीय साहित्याची खरेदी सुरू केली आहे. तसेच यावेळी ऑक्सिजन तुटवडा निर्माण होऊ नये, यासाठी १२ जंम्बो कोविड केंद्र आणि वरळीतील पोद्दार रुग्णालयात ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे प्रत्येक मिनिटाला एक लाख तीन हजार लिटर ऑक्सिजन निर्मीती केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी पालिका दोनशे कोटी रुपये खर्च करणार आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार सुरू झाल्यानंतर मुंबईत रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत गेली. या काळात ऑक्सिजनचा मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला होता. या काळात दररोज २३५ मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज भासत होती. त्यामुळे पालिकेने यापूर्वी १६ रुग्णालयांत ऑक्सिजन निर्मीती प्रकल्प उभारण्याचे काम सुरु केले आहे. हे प्रकल्प जुलैपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, काही ठिकाणी अद्याप हे काम पूर्ण झालेले नाही.