मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ५ हजार ५६० नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर १६३ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ६ हजार ९४४ जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६१,६६,६२० करोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८२ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,६९,००२ झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.१ टक्के एवढा आहे.
Rajesh Tope: ...त्या दिवशी राज्यात तातडीने लॉकडाऊन लागेल; राजेश टोपेंची महत्त्वाची माहिती
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,०१,१६,१३७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,६९,००२ (१२.७१ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,०१,३६६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर २,६७६ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत गेल्या २४ तासात २८९ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर ११५७ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत ७,१६,९४९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट ९७ टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या २४ तासात ९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत २९०० सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर १७५५ दिवसांवर गेला आहे.
राज्यात डेल्टा प्लसचे आज २० नवे रुग्ण-
राज्यात डेल्टा प्लस विषाणूची लागण झालेले आणखी २० रुग्ण आज आढळले असून डेल्टा प्लस बाधित एकूण रुग्णांची संख्या आता ६५ वर पोहचली आहे. नव्याने आढळलेल्या २० रुग्णांपैकी मुंबई येथे ७, पुणे येथे ३, नांदेड, गोंदिया, रायगड, पालघर येथे प्रत्येकी २, चंद्रपूर आणि अकोला येथे प्रत्येकी १ रुग्ण आढळला आहे.