मुंबई: गेल्या २४ तासांत राज्यात ६ हजार ३८८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २०८ जणांचा आज दिवसभरात मृत्यू झाला आहे. तसेच आज एकूण ८ हजार ३९० जणांनी कोरोनावर मात केली असल्याची माहिती, राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात आजपर्यंत एकूण ६१ लाख ७५ हजार १० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९६.८६ टक्के एवढे झाले आहे. आता राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६३,७५,३९० झाली आहे. तर सध्या राज्यातील मृत्यू दर २.११ टक्के एवढा आहे.
राज्यातील एकूण सक्रिय रुग्णांची संख्या ६२ हजार ३५१ इतकी आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांचा जिल्हानिहाय विचार करता पुणे जिल्ह्यात सक्रिय रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. पुणे जिल्ह्यात हा आकडा १४ हजार ४२३ इतका आहे. त्या खालोखाल सांगलीत एकूण ७ हजार ०२७ इतके रुग्ण उपचार घेत आहेत. तर, साताऱ्यात ही संख्या ६ हजार ५७३ इतकी आहे. या खालोखाल अहमदनगरमध्ये एकूण ४ हजार ९६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. ठाणे जिल्ह्यात ६ हजार १३३ सक्रिय रुग्ण आहेत. तर सोलापुरात ४ हजार ५५३ इतके रुग्ण आहेत.
मुंबईत ३२०८ सक्रिय रुग्ण
मुंबई महापालिका हद्दीत सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली असून ही सख्या ३ हजार २०८ इतकी आहे. तर, रायगडमध्ये १ हजार ४७२, रत्नागिरीत १ हजार ७१२, सिंधुदुर्गात १ हजार ४१४, बीडमध्ये १ हजार ५९८, नाशिकमध्ये सक्रिय रुग्णांची संख्या ८६७ इतकी आहे.
देशात आतापर्यंत ५२ कोटी लोकांचं लसीकरण-
देशात आतापर्यंत ५२ कोटी लोकांचं लसीकरण करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने याबाबतची माहिती दिली आहे. भारताला १० कोटी लोकांचं लसीकरण करण्यासाठी ८५ दिवसांचा अवधी लागला होता. त्यानंतर ४५ दिवसात २० कोटींचं लक्ष्य गाठलं. तर ३० कोटींचं लक्ष्य गाठण्यासाठी २९ दिवसांचा अवधी लागला. त्यानंतर २४ दिवसात ४० कोटींचं लक्ष्य गाठलं. आता मागच्या २० दिवसात ५० कोटींचं लक्ष्य गाठण्यात यश आलं आहे.