मुंबई : काेराेनाचा नवा विषाणू वेगाने पसरतो आहे. आठवड्याला ८ ते १० टक्क्याने काेराेनाच्या केसीस वाढत आहेत. त्यामुळे सतर्क राहण्याचे आवाहन राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. काेराेनाच्या सद्यस्थितीची माहिती देणारे पत्रक व्यास यांनी गुरूवारी विभागातील सहकाऱ्यांसाठी जारी केले आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून काेराेना बाधितांचा आलेख उतरणीला होता. आता मात्र जगातील काही भागात काेराेना बाधितांची संख्या वाढत आहे. केवळ दक्षिण आशियायी देशांत दिसणारी वाढ आता चीन आणि युरोपातही दिसू लागल्याचे पत्रकात म्हटले आहे. दोन वर्षात दिसली नाही, इतकी वाढ गेल्या २४ तासात काही देशांत नोंदविली गेली आहे.
इस्रायलसह अन्य काही देशांत नव्या विषाणूंमुळे रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. गर्दी टाळावी, मास्कचा वापर करा, लसीकरण वाढवा, याबाबत आपण राष्ट्रीय सरासरीच्या मागे आहोत, असे या पत्रकात म्हटले आहे. सध्या अवघ्या दोन हजार सक्रिय रुग्णांमुळे स्थिती नियंत्रणात आहे. मात्र, अवघ्या काही आठवड्यांतच यात लक्षणीय बदल होऊ शकतो, असे व्यास यांनी पत्रकात म्हटले आहे.
अवघ्या ५.१८ कोटी लोकसंख्येच्या दक्षिण कोरियात एका दिवसात ६.२१ लाख नवीन रुग्ण आढळले, तर, ८.३२ कोटींच्या जर्मनीत २.६२ लाख आणि ब्रिटनमध्ये ९४ हजार रूग्ण सापडले आहेत. १२.२ कोटी लोकसंख्या असलेल्या महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेतील एका दिवसातील सर्वाधिक संख्या ६८ हजार होती. त्यावरून दक्षिण कोरिया आणि युरोपीय राष्ट्रांतील संसर्गाची भयावहता लक्षात येते, असे व्यास यांनी पत्रकात म्हटले आहे.