मनोहर कुंभेजकर
मुंबई--एकीकडे पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असतांना रुग्णांना दर्जेदार आरोग्य सुविधा देतांना आरोग्य यंत्रणांवर मर्यादा येत असल्याचे चित्र आहे. गोरेगाव पूर्व येथील पश्चिम दुर्तगती महामार्गानजिक असलेल्या नेस्को कोविड सेंटरला मोबाईल सीटी स्कॅनची गरज आहे. सीटी स्कॅन अभावी सध्या रुग्णांना कूपर हॉस्पिटलमध्ये सीटी स्कॅनसाठी घेऊन जावे लागते.
तसेच येथे बेड्सची संख्या विशेषता सध्याच्या असलेल्या 88 आयसीयू बेडच्या संख्येत वाढ करण्याची गरज आहे. व्हेंटिलेटर्स आणि इंटेविस्टीस्ट वाढवणे आवश्यक आहे. डॉकटर्स, पॅरामेडिकल स्टाफ व इतर आरोग्य कर्मचारी वाढवणे आवश्यक आहे. येथे सफाई व्यवस्थित होत नाही अश्या तक्रारी आहेत. कमी असलेले मनुष्यबळ आणि रुग्णांचे मिळणारे असहकार्य अश्या परिस्थितीत येथील डॉकटर्स,नर्स व कर्मचारी चांगली सेवा देण्यासाठी प्रयत्न करत आहे.
येथे संध्याकाळी व रात्री रुग्णांचा वैद्यकीय चाचणी अहवाल लवकर मिळण्यासाठी व लँबोरेटरी इन्वेस्टीगेशनची सुविधा उपलब्ध होणे गरजेचे असून त्यासठी इतर लॅबोरेटरी बरोबर प्रासांगिक करार करणे गरजेचे आहे. राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी नुकतीच नेस्को कोविड सेंटरला भेट दिली. यावेळी येथील अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे यांच्याशी त्यांनी येथील आरोग्य सुविधा आणि त्यांना येणाऱ्या अडचणी यावर सविस्तर चर्चा केली.त्यांनी आपला पाहाणी अहवाल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर केला.
पोस्ट ग्रॅज्युएशन करणाऱ्या डॉकटरांना सध्या फक्त त्यांना कोविड ड्युटी देणे तसेच त्यांच्या बॉण्ड मध्ये सूट दिल्यास ते अधिक जोमाने जे काम करतील असे मत त्यांनी व्यक्त केले.तसेच चेस्ट फिजिशियन व अँनास्थेटिस्ट वेळेवर उपलब्ध केल्यास मृत्यू दर निश्चित कमी होईल असे त्यांनी अहवालात नमूद केले आहे. कमी असलेले मनुष्यबळ आणि रुग्णांचे मिळणारे सहकार्य अश्या परिस्थितीत येथील अधिष्ठाता डॉ.नीलम अंद्राडे आणि त्यांचे डॉकटर्स चांगले काम करत असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतला सांगितले.
लसीकरणाची चांगली सुविधा
नेस्को मधील लसीकरणाचा देखिल डॉ.,दीपक सावंत यांनी आढावा घेतला. दि,29 जानेवारी पासून येथे लसीकरण सुरू झाले. तर काल पासून सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत येथे लसीकरण सुरू झाले. अतापर्यंत 78202 नागरिकांनी लस घेतली असून यामध्ये कोविशिल्ड लस घेणाऱ्यांची संख्या 73743 इतकी असून कोवॅक्सिंन लस ही 4459 नसगरिकांनी घेतली अशी माहिती डॉ.नीलम अंद्राडे यांनी दिली. लसीरणासाठी नेस्को सेंटर सज्ज असून येथे चांगली सुविधा असल्याचे त्यांनी सांगितले.