Join us

Coronavirus Vaccine: नायरमध्ये मुलांच्या लसीची चाचणी यशस्वी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 9:18 AM

१२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ट्रायल ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. या केवळ चार दिवसांत सहा मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली आहे.

मुंबई : नायर रुग्णालयात सुरू असलेली लहानग्यांच्या कोरोना प्रतिबंधक लसीची चाचणी यशस्वी झाली आहे. अजूनही या चाचणीत स्वयंसेवकांची गरज आहे. रुग्णालय प्रशासनाने यात सहभागी होण्यासाठी पालकांसह लहानग्यांसाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे. लहान मुलांवरील लसीकरणाची चाचणी पालिकेच्या मुंबई सेंट्रल येथील वाय.बी.एल. नायर रुग्णालयात सुरू आहे. १२ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांच्या लसीकरणाची ट्रायल ८ ऑक्टोबरपासून सुरू झाली. या केवळ चार दिवसांत सहा मुलांची यशस्वी ट्रायल करण्यात आली आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींचे यशस्वी लसीकरण सुरू झाल्यानंतर आता लवकरच लहान मुलांच्या लसीकरणाची सुरुवात होणार असल्यामुळे नायर रुग्णालयात १२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाची ट्रायल सुरू करण्यात आली आहे. यासाठी २३०२७२०५ आणि २३०२७२०४ असे दोन दूरध्वनी क्रमांक नोंदणीसाठी दिले आहेत.पालिकेने केलेल्या सेरो सर्वेक्षणानुसार ५० टक्के नागरिकांमध्ये प्रतिपिंडे तयार झालेले असल्याने अँटीबॉडीज आढळलेल्या मुलांमध्ये मार्गदर्शक सूचनेनुसार चाचणी घेता येणार नाही असेही डॉ. भारमल यांनी सांगितले. मुलांच्या लसीकरणाच्या चाचणीसाठी नवीन नियमावली बनवण्यात आली आहे. ‘प्रतिसाद वाढवा’ नवीन नियमावलीनुसार पालिकेने २ ते १८ वर्षे वयोगटासाठी तीन गट बनवण्यात आले आहेत. यामध्ये २ ते ७ वर्षे, ८ ते ११ आणि १२ ते १८ वर्षे असे वयोगट तयार करण्यात येत आहेत. चाचणीसाठी प्रतिसाद वाढण्याची गरज असल्याचे डॉ. भारमल यांनी सांगितले.

टॅग्स :कोरोनाची लसकोरोना वायरस बातम्या