शेफाली परब - पंडितमुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी दररोज एक लाख लोकांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य महापालिकेने ठेवले आहे. यासाठी लसीकरण केंद्रांची संख्याही वाढविण्यात येत आहे. मात्र, लसीचा पुरवठा मागणीपेक्षा कमी होत असल्याने ही मोहीमच अडचणीत येण्याची शक्यता आहे. कमी साठा असल्याने सध्या ठाण्यातील मोहीम अडचणीत आहे. सध्या तीन लाख लसींचा साठा महापालिकेकडे आहे. मुंबईतील लाभार्थींच्या तुलनेत हा आकडा कमी असल्याने लसींचा साठा वाढवून देण्याची मागणी पालिका प्रशासनाने केंद्राकडे केली आहे.
मुंबईत १६ जानेवारीपासून लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि १ मार्चपासून ज्येष्ठ नागरिक आणि ४५ वर्षांवरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना लस देण्यात येत आहे. दरम्यान, फेब्रुवारीच्या मध्यापासून कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. दररोज तीन हजारांहून अधिक रुग्णांची नोंद होत असल्याने धोका वाढला आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयांमध्ये लसीकरण केंद्रांची संख्या वाढवून दररोज एक लाख याप्रमाणे ४५ दिवसांमध्ये ४५ लाख लोकांचे लसीकरण पूर्ण करण्याचा निर्धार महापालिकेने केला आहे.
मात्र, लसीकरण निर्धारित वेळेत होण्यासाठी त्याच वेगाने लसींचा पुरवठा योग्य वेळेत आणि नोंदणी केल्यानुसार मिळावा, अशी पालिकेची मागणी आहे. मात्, जितक्या लसींची नोंदणी करण्यात येते, तितक्या प्रत्यक्षात येत नाहीत. त्यामुळे केवळ केंद्रांची संख्या वाढवून उद्दिष्ट् कसे गाठणार? अशी अडचण पालिका अधिकाऱ्याने व्यक्त केली. पुढील सात दिवसांमध्ये किती लसींची गरज लागेल, त्याप्रमाणे साठा मागविण्यात येत आहे. दिनांक १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण सुरु करण्यात येणार आहे. त्यामुळे दर आठवड्याला ३३ लाख लसींचा पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी केंद्राकडे केली असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले.
सध्या पालिकेकडे तीन लाख लसींचा साठा आहे. गरजेप्रमाणे वेळेवेळी साठा मागविण्यात येतो. लसींचा साठा वाढवून देण्याची मागणी केंद्राकडे करण्यात आली आहे. - सुरेश काकाणी (अतिरिक्त आयुक्त)