Coronavirus Vaccines : कोरोनाच्या ५० हजार लसी वाया जाणार; साठा बदलून देण्याची खासगी रुग्णालयांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 06:01 AM2022-02-21T06:01:09+5:302022-02-21T06:01:30+5:30
मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांमधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या साठ्याची मुदत लवकर संपुष्टात येणार आहे.
मुंबई : मुंबईतील तीन खासगी रुग्णालयांमधील कोविशिल्ड आणि कोव्हॅक्सिन लसीच्या साठ्याची मुदत लवकर संपुष्टात येणार आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुदत संपणार असून या लसी मात्र बदलून द्याव्यात, याकरिता खासगी रुग्णालय प्रशासनाने राज्याच्या आरोग्य विभाग आणि मुंबई पालिकेला लेखी निवेदन दिले आहे. मुदत संपायला येणाऱ्या ५० हजारांहून अधिक लस मात्रा घेऊन त्य़ा बदल्यात नवा साठा खासगी रुग्णालयांना देण्यात यावा, असे यात नमूद करण्यात आले आहे.
मुंबईच्या अंधेरी येथील कोकिलाबेन धीरुभाई अंबानी रुग्णालयाकडे १५ ते १६ हजार लस मात्रा आहेत. त्यांची मुदत मार्चच्या पहिल्या आठवड्यात संपणार आहे. तर मुलुंड व बोरिवली येथील ॲपेक्स रुग्णालय समूहाकडे १० हजार लस मात्रा असून त्यांची मुदत ५ मार्चला संपणार आहे. खासगी रुग्णालयांचे समन्वयक डॉ. गौतम भन्साळी यांनी सांगितले की, शहर उपनगरातील खासगी रुग्णालयांकडील बराचसा लससाठा हा एक - दोन महिन्यांत कालबाह्य होणार आहे.
- शहर उपनगरांतील खासगी रुग्णालयांमधील जवळपास दोन लाख लस मात्रांचा साठा जून २०२२ मध्ये कालबाह्य होणार आहे.
- तांत्रिक कारणांमुळे खासगी रुग्णालयांना पालिका लससाठा बदलून देऊ शकत नाही, अशी माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
- यावर तोडगा म्हणून खासगी रुग्णालयांना महापालिका प्रशासन लसीकरण केंद्रावर जागा देण्यास तयार असून त्यांनी सीएसआरअंतर्गत या ठिकाणी लसीकरण मोहीम राबवावी, असेही त्यांनी नमूद केले आहे.