CoronaVirus : प्रलंबित अहवालांमुळे रुग्णसंख्येत तफावत; घाबरुन न जाण्याचे प्रशासनाचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: April 21, 2020 08:11 PM2020-04-21T20:11:42+5:302020-04-21T20:11:50+5:30
CoronaVirus : राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणारी आकडेवारी पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजीकडूनही प्रलंबित रिपोर्ट आणि उशिरा येणाऱ्या रिपोर्टचा समावेश करून जाहीर करण्यात येत असते.
मुंबई - राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या मुंबईच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या आकडेवारीत प्रलंबित रिपोर्टचाही समावेश असल्यामुळे रुग्ण वाढलेले दिसतात. शिवाय, पालिकेकडून जाहीर करण्यात येणारी आकडेवारी ही संबंधित दिवशी दुपारी दोन वाजेपर्यंतची असते.
राज्य सरकारकडून जाहीर करण्यात येणारी आकडेवारी पुण्याच्या नॅशनल व्हायरोलॉजीकडूनही प्रलंबित रिपोर्ट आणि उशिरा येणाऱ्या रिपोर्टचा समावेश करून जाहीर करण्यात येत असते. त्यामुळेच राज्य सरकार आणि मुंबई महानगर पालिका यांच्या रिपोर्टमध्ये तफावत दिसत असल्याचे राज्य सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घाबरू नये असे आवाहनही राज्य सरकारकडून करण्यात आले आहे.
राज्य सरकारकडे राज्यभरातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका यांच्याकडून रिपोर्ट येत असतात. हे रिपोर्ट दुपारी २ ते ४ वाजेपर्यंत असतात. यानंतरही संबंधितांकडून, खासगी लॅबकडून ऑनलाईन रिपोर्टही नोंदवले जातात. हे सर्व अहवाल सायंकाळी नॅशनल व्हायरोलॉजीकडे एकत्र केल्यानंतर जाहीर केले जातात. राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये प्रलंबित आणि उशिरापर्यंत आलेल्या रिपोर्टचा समावेश असल्यामुळे तफावत दिसते.
मुंबई महानगरपालिका राज्य सरकारकडे दुपारी दोनवाजेपर्यंतचे रिपोर्ट ऑनलाईन सादर करते. ऑनलाईन रिपोर्ट सादर करण्याची सुविधा ही पालिका आणि खासगी प्रयोगशाळांना उशिरापर्यंत नोंद करण्याची उपलब्ध असल्याने राज्य सरकारचा आकडा वाढलेला दिसू शकतो.