Join us

CoronaVirus News: सामाजिक अंतर पाळत होतेय भाजीविक्री

By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2020 2:14 AM

ग्राहकांनो, तुम्हीही भान ठेवा; मास्कवर ‘अपना टाइम आयेगा’चा उल्लेख

मुंबई : कोरोनाला हरविण्यासाठी लागू करण्यात आलेल्या अडीच महिन्यांच्या लॉकडाऊननंतर आता हळूहळू का होईना मुंबई पूर्वपदावर येऊ लागली. मुंबई पूर्वपदावर येत असतानाच ठिकठिकाणी व्यवहारही वेगाने सुरू झाले. आणि अशाच वेगाने व्यवहार होत असलेल्या बाजारपेठांमध्ये खरेदी करण्यासाठी मुंबईकरांनी गर्दी सुरु केली. बाजारपेठांमध्ये भाजीपाल्याची गर्दी करण्यासाठी मुंबईकरांकडून गर्दी केली जात असून, सामाजिक अंतराचे नियम धाब्यावर बसविले आहेत. मात्र भाजी विकणाऱ्या भाजी विक्रेत्यांनी सामाजिक अंतर पाळले आहे.कुर्ला येथील बैलबाजार आणि सोनापूर गल्ली येथील बाजारात मंगळवारी याचा प्रत्यय आला असून, आता भाजी विक्रेत्यांप्रमाने ग्राहकांनीही सामाजिक अंतर पाळावे आणि कोरोनाला दूर  पळवावे, असे आवाहन येथील सामाजिक कार्यकर्त्यांकडून केले जात आहे. कुर्ला पश्चिमेला  बैलबाजार आणि सोनापूर गल्ली येथे मोठी बाजारपेठ भरते. आता अनलॉक सुरू झाल्यापासून येथील दोन्ही बाजारपेठा सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत सुरू असतात. दोन्ही बाजारपेठेत दिवसाला हजारो ग्राहक येतात. कुर्ला रेल्वे स्थानकापासून, साकीनाका, काजूपाडा, जरीमरी, बैलबाजार, क्रांतीनगर, संदेश नगर, कमानी, ख्रिश्चन गाव, कुर्ला डेपो, सुंदरबागसह लगतच्या बहुतांश भागातून ग्राहक येथे भाजीपाल्याच्या खरेदीसाठी येथे येतात. भाजीप्रमाणे येथे फळेही विकली जातात. केवळ भाजीपालाच नाही तर दैनंदिन जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट येथील बाजारपेठेत मिळते.लॉकडाऊन लागू असतानाही येथील भाजीपाला विक्रेत्यांसह किरणा साहित्य विक्रेत्यांनी सामाजिक अंतर पाळले होते. आणि आता अनलॉक सुरू झाल्यापासूनही येथे भाजीपाला विक्रेत्यांसह किरणा साहित्य विक्रेत्यांकडून सामाजिक अंतर पाळले आहे. परिणामी आता ग्राहकांनीही देखील सकारात्मक विचार करावा. भाजी खरेदी करण्यासाठी रांग लावावी. एकाच ठिकाणी गर्दी करू नये. आणि सामाजिक अंतर पाळत कोरोनाला पळवून लावावे, असे म्हणणे जागृत नागरिकांकडून मांडत नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. दरम्यान, येथील बहुतांशी दुकानांमध्ये मास्कची विक्री केली जात असून, काही मास्क विविध संदेश देणारे आहेत. जसे की  ‘अपना टाइम आयेगा’ असे उल्लेख असलेला मास्क येथील बाजारपेठेत सध्या आकषर््ण ठरत असल्याचे चित्र आहे. 

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या