Coronavirus : वेसावकरांनी सामोपचाराने घेतला गाव बंद करण्याचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: April 9, 2020 07:20 PM2020-04-09T19:20:36+5:302020-04-09T19:20:53+5:30
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामोपचाराने गाव बंद करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी लोकमतला दिली.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : कोरोनाचे रुग्ण जर सापडले तर पालिका प्रशासन पोलिसांच्या मदतीने कोरोनाबाधीत भाग लॉकडाऊन करते.मात्र अंधेरी पश्चिम वर्सोवा विभागात करोनाचे रुग्ण सापडले आहेत,हे लक्षात घेता रुग्णांची संख्या वाढू नये आणि करोना महामारीचा प्रसार - प्रादुर्भाव होऊ नये म्हणून वेसावा कोळी जमात ट्रस्टच्या पुढाकाराने वेसावे गावातील सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन उद्यापासून वेसावे गाव तीन दिवस संपूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.अश्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सामोपचाराने गाव बंद करण्याची ही राज्यातील पहिलीच घटना आहे अशी माहिती कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके यांनी लोकमतला दिली.
आज वेसावे कोळीवाड्यातील श्री हिंगळा देवी सभागृह येथे दुपारी झालेल्या या महत्वाच्या सभेत उद्यापासून वेसावे गाव बंद करण्याचा निर्णया संदर्भात सोशल डिस्टनसिंग पाळत आणि संबंधितांनी तोंडाला मास लावत महत्वाची सभा झाली. येथील वेसावा कोळी जमात ट्रस्ट, कोकणी सुन्नी जमात ट्रस्ट, यंग मुस्लिम कमिटी आणि अशा निरनिराळ्या सामाजिक संस्थांची एकत्र सभा झाली. त्यावेळी हा निर्णय घेतला अशी माहिती वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय यांनी दिली.
यानुसार वेसावा गाव पुढील तीन दिवस संपूर्ण बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून जीवनावश्यक वस्तू वितरण यंत्रें ला देखील गर्दी न होता सहकार्य करण्याची योजना यावेळी आखण्यात आली. त्याचबरोबर विलगीकरणाची सोय व्हावी म्हणून वेसावा येथील स्वातंत्र्यसैनिक पोशा नाखवा उद्यान शाळा संकुल आणि वेसावे महापालिका मराठी शाळा या महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या शाळांमध्ये विलगीकरण विभाग स्थापन करावा अशीही मागणी वेसावकरांनी यावेळी केली.
या सभेला प्रभाग क्रमांक 59 च्या स्थानिक नगरसेविका प्रतिमा खोपडे, वेसावा कोळी जमात ट्रस्टचे अध्यक्ष सचिन चिंचय, कोळी महासंघाचे सरचिटणीस राजहंस टपके, कोकणी सुन्नी जमातीचे अध्यक्ष सलीम रांजे,स्थानिक शाखाप्रमुख सतीश परब, यंग मुस्लिम कमिटीचे अध्यक्ष बाबा पठाण, ट्रस्टचे सेक्रेटरी राजहंस लाकडे,राखी धाकले,विशाल मांडवीकर आणि निरनिराळ्या संस्थांचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.