- मनोहर कुंभेजकरमुंबई--कोरोनामुळे राज्यातील मत्स्यव्यवसाय ठप्प झाला असतांना वेसावकरांची सामाजिक बांधिलकी जपली.येथील वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटीने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला अडीच लाख रुपयांची मदत करण्याचा निर्णय आज सर्व कार्यकारी मंडळाने एकमताने घेतला.
गेल्या 1 ऑगस्टला मासेमारीचा नवा मोसम सुरू झाला खरा,परंतू त्यांनंतर झालेली अतिवृष्टी व आलेली चार ते पाच चक्रीवादळे यामुळे राज्यातील मच्छिमारांना मत्स्य दुष्काळाचा सामना करावा लागला आहे.आता कोरोनामुळे संपूर्ण देश गेल्या दि,22 पासून लॉकडाऊन झाल्याने राज्यातील मत्स्यव्यवसाय ठप्प झाला असून 90 टक्के बोटी समुद्रकिनारी नांगरून ठेवल्या आहेत.मात्र सामाजिक बांधिलकी जपत महाराष्ट्रावर जेव्हा संकट येते,त्यावेळी वेसावकरांच्या मदतीचा हात सतत पुढे असतो.येथील मच्छिमार सहकारी संस्था देखिल सरकारच्या पाठीशी खंबीरपणे उभा ठाकल्याचे दृष्य वेसाव्यात दिसून आले. वेसावा मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी लिमिटेडच्या सर्व संचालक मंडळाने आज एकमुखाने निर्णय घेऊन मुख्यमंत्री निधीसाठी अडीच लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे अशी माहिती सोसायटीचे अध्यक्ष किशोर भेली व सरचिटणीस नारायण कोळी यांनी लोकमतला दिली.
सहकारी संस्थेच्या माध्यमातून मच्छिमारांना सरकारनेआतापर्यंत वेळोवेळी मदत केलेली आहे. परंतू आज परिस्थिती भयंकर आहे, याची जाणीव आपण सर्वांनाच आहे, कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना सरकार करत आहे.नागरिकांच्या आरोग्यासाठी डॉक्टर ,नर्सेस ,सपोर्टिंग स्टाफ ,पोलीस यंत्रणा अत्यावश्यक सेवा पुरवणारे कर्मचारी व लोकांना अन्नधान्याचा पुरवठा या प्रश्नावर सरकार फार मोठ्या आर्थिक संकटाशी मुकाबला करीत आहे. कोरोना संकटाशी सामना करण्यासाठी सरकारने सर्व ताकद पणाला लावली आहे.त्यामुळे राज्यातील सर्व 3400 मच्छीमार सहकारी संस्थांनी सुद्धा याच भावनेने विचार करून कोरोना संकटाशी लढण्यासाठी सरकारला सहकार्य करावे असे मत सोसायटीचे उपाध्यक्ष नाशिकेत जांगले व सर्व कार्यकारी मंडळाने शेवटी व्यक्त केले.