मुंबई : अंडरवर्ल्ड असो वा २६/११चा दहशवादी हल्ला, प्रत्येकाला उत्तर देत, विजय पोलिसांचाच झाला आहे. यंदाही कोरोनाच्या रूपात न दिसणाऱ्या शत्रूसोबत युद्ध सुरू आहे. हेही युद्ध आपणच जिंकू, असा विश्वास मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी जे. जे. मार्ग पोलिसांचे मनोधैर्य वाढविताना व्यक्त केला.
राज्यभरात कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा ५३१ वर पोहोचला आहे. त्यात कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या मुंबईत दोनशेहून अधिक पोलीस कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. त्यातच जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात सर्वाधिक २६ कोरोनाबाधित पोलीस आढळल्याने पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांमध्ये चिंतेचे, तणावाचे वातावरण आहे. अशात कर्मचाºयांना धीर देण्यासाठी परमबीर सिंह यांनी गुरुवारी जे. जे. मार्ग पोलीस ठाण्यात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. कर्मचाºयांशी संवाद साधत त्यांना धीर देत हे युद्ध आपल्याला जिंकायचे असल्याचे सांगितले.
सर्वांचा पोलिसांवर विश्वास आहे. तो विश्वास तसाच कायम ठेवत या युद्धातही आपल्यालाच जिंकायचे आहे. त्यामुळे जोमाने न खचता पुढे लढत राहायचे, असे त्यांनी पोलिसांना सांगितले. तसेच प्रत्येकाची विचारपूस केली. त्यांच्या कामाचे कौतुक करत त्यांना प्रोत्साहित केले.