CoronaVirus: विनय दुबेची गाडी हस्तगत; वांद्रे पोलिसांनी पंचनाम्यासाठी घेतली ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2020 01:20 AM2020-04-19T01:20:54+5:302020-04-19T01:22:49+5:30
विनय दुबेला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी
मुंबई : वांद्रे पोलिसांनी मजूर जमाव प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असलेल्या विनय दुबे याची गाडी हस्तगत केली. ही गाडी पंचनाम्यासाठी ताब्यात घेतली असून त्याचा वापर पुरावा म्हणून केला जाणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. तर न्यायालयाने त्याला २१ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
उत्तर भारतीय महापंचायतचा प्रमुख विनय दुबे याने मजुरांना व्हिडीओमार्फत भडकविल्याचा आरोप करत त्याला वांद्रे पोलिसांनी अटक केली. त्याने हा व्हिडीओ त्याच्या सफारी गाडीमध्ये बसून बनविला. त्यानुसार त्याची ती गाडी हस्तगत करण्यात आल्याचे त्याच्या घरच्यांना पोलिसांकडून सांगण्यात आले. या गाडीचा पंचनामा करण्यात येणार असून, गुरुवारी रात्री ८ च्या सुमारास ही गाडी रबाळे परिसरातून पोलिसांनी ताब्यात घेतली. गुन्ह्यात त्याने वापरलेली प्रत्येक वस्तू पोलीस ताब्यात घेत आहेत. दरम्यान, सोशल मीडियावरून दुबे याच्या कुटुंबीयांना येणाऱ्या धमक्यांचे प्रमाण वाढले असल्याने त्यांना सुरक्षा पुरविणे गरजेचे असल्याचे त्याचे वकील अॅड. तन्वीर फारुखी यांचे म्हणणे आहे. याप्रकरणातील १२ संशयितांपैकी पत्रकार राहुल कुलकर्णीला जामीन देण्यात आला आहे, तर दुबे व्यतिरिक्त अन्य दहा जणांची पोलीस कोठडी १९ एप्रिल रोजी संपत आहे. त्यानुसार त्यांना न्यायालयीन कोठडी होणार की, पोलीस कोठडी हे रविवारीच समजेल.