मुंबई: कोरोनाचा वाढता धोका, लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ आलेले हजारो मजूर विविध अफवांमुळे मंगळवारी वांद्रे स्थानक परिसरात जमल्याने तणाव निर्माण झाला होता. काही मजुरांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दोन तासांनी ही गर्दी नियंत्रणात आली. या प्रकरणी सुमारे ८०० ते १००० जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ही अफवा पसरवण्यासाठी कारणीभूत असलेल्या विनय दुबेलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. विनय दुबे याच्यावर महारोगराई अधिनियम कलम ३ आणि आयपीसीच्या कलम ११७, १५३ ए, १८८, २६९, २७०,५०५(२) अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्याला बुधवारी स्थानिक न्यायालयात हजर केले जाणार आहे. फेसबुकवरून विनय दुबे नावाच्या व्यक्तीने मजुरांना उद्देशून एक व्हिडीओ १२ एप्रिल रोजी पोस्ट केला होता. यात त्याने मजुरांना आता मदतीसाठी नाही तर गावी जाण्यासाठी लढण्याचे आवाहन केले. शिवाय याविरुद्ध मोहीम छेडण्यासाठी स्वत:चा मोबाईल क्रमांक शेअर केला आहे. हा व्हिडीओ १६ हजारांहून अधिक जणांनी शेअर केला होता. तसेच यापूर्वी परप्रांतीयांसाठी विशेष ४० बसेसची व्यवस्था केल्याचा व्हिडीओही अपलोड केला होता. तो २१ हजार लोकांनी शेअर केला होता. गेल्या अनेक दिवसांपासून त्याने अशा प्रकारे मोहीम छेडल्याचे दिसून आले. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, राजस्थान, मध्य प्रदेश, कर्नाटकसह विविध राज्यांतून मुंबईत नोकरीसाठी आलेल्यांचे रोजगार हिरावल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ ओढावली आहे. त्यात घरभाडेही द्यायला नसल्याने काहींनी पदपथावर संसार थाटला. तर काहींनी पायीच गावी जाण्याचा निर्णय घेतला. १४ एप्रिलच्या मध्यरात्रीपासून अडकलेल्यांना आपापल्या गावी जाण्याची परवानगी मिळेल, अशी आशा अनेकांना होती. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन केंद्राने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवताना त्याची आणखी कठोरपणे अंमलबजावणी करण्याचे धोरण अवलंबले आहे. अशात वांद्रे पूर्वेकडे घास बाजार ही तयार कपड्यांची सर्वात मोठी घाऊक बाजारपेठ आहे. त्याशिवाय येथे जरी काम, चप्पल, बॅग असे विविध उद्योग आणि व्यवसाय आहेत. जेथे व्यवसाय म्हणजे तेथेच उत्पादन करून मजुरांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे हजारो मजूर या भागात राहण्यास आहेत. तेच मजूर गावी जाण्यासाठी रस्त्यावर आल्याचं चित्र मंगळवारी पाहायला मिळालं.