Coronavirus: कोरोनामुक्त गोराईसाठी महिला ब्रिगेडचा जागता पहारा; पर्यंटकांना गोराई बीचवर प्रवेशबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 07:09 PM2020-06-15T19:09:53+5:302020-06-15T19:10:03+5:30
येथील सुमारे 40 ते 50 महिला ब्रिगेड रोज सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत गोराई येथील शेफाली आणि गोराई रिक्षा स्टॅण्ड जवळ जगता पहारा ठेवत चार चाकी वाहने, बाईकने गोराई बीचवर येणाऱ्या बाहेरील नागरिकांना तिकडेच रोखून परत माघारी पाठवता.
मनोहर कुंभेजकर
मुंबई : बोरिवली पश्चिम खाडी पलीकडे सुमारे 17000 ते 18000 लोकवस्तीचे गोराई गाव हे कोरोना व्हायरस पासून मुक्त असल्याबद्धल गोराईच्या गावकऱ्यांना अभिमान आहे.लोकसभागातून आणि गावकऱ्यांनी एकत्र येऊन गोराई गाव आजपर्यंत कोरोनामुक्त ठेवला आहे.गोराई गावाचा पॅटर्न तो ही देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत यशस्वी झाला आहे.
एकीकडे मुंबईत काल पर्यंत 58,135 कोरोनाचे रुग्ण असतांना,बोरिवली पश्चिम खाडीपलीकडे असलेल्या गोराई गाव आजपर्यंत कोरोना मुक्त आहे.विशेष गोराईत कोरोनाला अजिबात थारा द्यायचा नाही असा निर्धार करत दि,25 मार्च रोजी लॉकडाऊन सुरू झाल्या पासून येथील होली मेजाय चर्चचे फादर एडवर्ड जसिंतो यांच्या मार्गदर्शनाखाली गोराईकरांनी दिवस रात्र जगता पहारा ठेवत बाहेरन येणारे नागरिक व पर्यटक यांना गोराई गावात प्रवेश बंदी केली होती.कोरोना मुक्तीसाठी येथील चर्चच्या मागील बाजूस असलेल्या ग्राउंडवर गोराईचा बाजार नेण्यात आला. आता हा बाजार ताडपत्री टाकून बंदीस्त केला असल्याची माहिती त्यांनी दिली.
आता लोकडाऊन थोडा शिथील केल्यानंतर पर्यंटकांनी जर जर गोराई बीचवर जाण्याचा विचार केला असेल,तर तो रद्द करा. कारण गोराई गावात प्रवेश करतांना तुम्हाला गावात जाणाऱ्या रस्त्यावर पहारा देणाऱ्या तीन ते चार महिला रोखतील. उत्तन ते गोराई, मनोरी ते गोराई आणि बोरिवली जेट्टी ते गोराई या प्रमुख मार्गांवरून कोणत्याही बाहेरील व्यक्तीला गोराई गावात प्रवेश करण्याची परवानगी नाही. गावात प्रवेश करणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करून आणि खातरजमा करून गावात प्रवेश केला जातो. याचा अनुभव काल काही कामानिमित्त गोराई गावात गेलो असता,माझी गाडी येथील चार पाच महिलांनी आडवली. परंतू माझा या गावाशी जवळचा परिचय असल्याने आणि नातेवाईकना भेटायला असे सांगितल्यावर माझी गाडी त्यांनी सोडली अशी माहिती वॉचडॉग फाउंडेशनचे विश्वस्त अँड.गॉडफे पिमेटा यांनी दिली.
गेल्या सोमवार दि,8 पासून राज्य सरकारने लॉकडाऊन शिथील केल्या नंतर मुंबईतील समुद्रकिनारे नागरिकांसाठी खुले केले.मात्र कोरोनाग्रस्त मीरा-भाईंदर आणि अन्य भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक गोराई बीचवर येऊ लागले.त्यामुळे कोरोनामुक्त गोराईसाठी आणि पावसात समुद्राला उधाण येत असल्याने बुडण्याच्या दुर्घटनांना आळा घालण्यासाठी गोराई बीच रिसॉर्ट असोसिएशनच्या सदस्यांनी फादर एडवर्ड जसिंतो यांच्या मार्गदर्शनाखाली सोशल डिस्टनसिंग पाळत एक मिटींग घेतली.यावेळी गोराई बीचवर बाहेरून येणाऱ्या पर्यटकांना प्रवेशबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला अशी माहिती गोराई बीच रिसॉर्ट असोसिएशनचे अध्यक्ष जोरम राजाकोळी यांनी लोकमतला दिली.
येथील सुमारे 40 ते 50 महिला ब्रिगेड रोज सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत गोराई येथील शेफाली आणि गोराई रिक्षा स्टॅण्ड जवळ जगता पहारा ठेवत चार चाकी वाहने, बाईकने गोराई बीचवर येणाऱ्या बाहेरील नागरिकांना तिकडेच रोखून परत माघारी पाठवता. दर दोन तासाला 4 ते 5 महिला याप्रमाणे सकाळ पासून दिवसभर येथे जगता पहारा ठेवतात. गेल्या सोमवारी लॉकडाऊन शिथील केल्यानंतर पहिल्याच दिवशी गोराई बीचवर आलेल्या पर्यटकांची सुमारे 200 चार चाकी आणि दुचाकी वाहने आम्ही परत पाठवली अशी माहिती फादर एडवर्ड जसिंतो यांनी लोकमतला दिली. बोरीवलीचे भाजपा आमदार सुनील राणे व माजी नगरसेवक शिवानंद शेट्टी गोराईकरांना याकामी चांगले सहकार्य करत असल्याची माहिती त्यांनी शेवटी दिली.