Coronavirus : 'आम्ही तुमच्यासाठी ऑन ड्युटी २४ तास.... तुम्ही आपल्यासाठी घरी बसा'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2020 08:24 PM2020-03-20T20:24:21+5:302020-03-20T20:25:05+5:30
देशभरातील बहुतांश मंदिरे बंद ठेवण्यात आली असून देऊळ बंद अशीच परिस्थिती दिसून येतेय. मात्र, देशातील हॉस्पीटल आणि पोलीस ठाणे मात्र सुरू आहेत.
मुंबई - कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. याच पार्श्वभूमीवर लोकांनी गर्दी टाळण्याचा प्रयत्न करावा, सरकारच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि कामे घरातून करावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जनतेला केले आहे. तर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे हेही आपलं काम चोखपणे बजावत आहेत. राज्य सरकारसोबत वैद्यकीय क्षेत्र आणि पोलीस यंत्रणाही नागरिकांसाठी रात्रंदिवस झटताना दिसत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. तर, अनेक मोठ्या कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम सुविधा सुरू केली आहे. मात्र, पोलीस आणि डॉक्टर्स यांना या आणीबाणीच्या काळात आपलं घर सोडावं लागत आहे. कोरोनाचं संकट हे देशावरील संकट मानून हे दोन्ही क्षेत्र २४ तास सेवा देत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी २२ मार्च म्हणजेच रविवारी देशभरात जनता कर्फ्यु लागू करण्याची विनंती देशवासियांना केली आहे. दिवसभर घरातून बाहेर न पडता आपण कोरोनाच्या लढाईत एकत्र आहोत, आणि योगदान देत आहोत, हे दाखवून देण्याचं आवाहन केलंय. तसेच, कोरोना रोगाच्या आणीबाणी प्रसंगात देशभरात विविध संस्था, संघटना, व्यक्ती आणि समाज आपलं योगदान देत आहे. कोरोनासंदर्भात जनजागृती आणि उपाय करण्यासाठी झटत आहेत. या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचेही मोदींनी सूचवले आहे. सध्या, देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. मात्र, पोलीस आणि डॉक्टर्स यांची ऑन ड्युटी २४ तास सेवा सुरू आहे. पोलीस दिवसरात्र सेवा बजावत आहेत. तर, डॉक्टर्स आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारीही पायाला भिंगरी लावून, डोळ्यात तेल घालून नागरिकांच्या उपचारासाठी तयार आहेत.
देशभरातील बहुतांश मंदिरे बंद ठेवण्यात आली असून देऊळ बंद अशीच परिस्थिती दिसून येतेय. मात्र, देशातील हॉस्पीटल आणि पोलीस ठाणे मात्र सुरू आहेत. आपले कर्तव्य बजावताना, देशसेवेसाठी पांढरा कोट अन् खाकी वर्दी तैय्यार आहे. त्यातच, पोलिस आणि डॉक्टर्संकडूनही नागरिकांना घरी बसण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आम्ही तुमच्यासाठी कर्तव्यावर आहोत, तुम्ही आपल्यासाठी घरी बसा... असा संदेशच पोलीस आणि डॉक्टर्संने दिला आहे. सध्या सोशल मीडियावर अशी पाटी लिहिलेला फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये, पोलीस आणि डॉक्टर्संकडून नागरिकांना भावुक आवाहन करण्यात येत आहे. विशेष म्हणजे राजकीय पुढारी आणि सेलिब्रिटींनीही हा फोटो पाहून पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेल सलाम केला आहे. तर डॉक्टरांच्या सेवेला मनापासून धन्यवाद दिलंय.