Coronavirus: आम्ही नियम पाळतो, मात्र कडक निर्बंध उठवा, व्यापारी संघटनांचे राज्य सरकारला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2021 07:11 AM2021-05-23T07:11:47+5:302021-05-23T07:12:31+5:30

Coronavirus lockdown Update: सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीचे व्यापारी काटेकोर पालन करतील, अशी हमी राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी दिली आहे.

Coronavirus: We follow the rules, but lift strict restrictions, trade unions appeal to the state government | Coronavirus: आम्ही नियम पाळतो, मात्र कडक निर्बंध उठवा, व्यापारी संघटनांचे राज्य सरकारला आवाहन

Coronavirus: आम्ही नियम पाळतो, मात्र कडक निर्बंध उठवा, व्यापारी संघटनांचे राज्य सरकारला आवाहन

Next

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १ जूनपासून कोरोना रोखण्याचे केलेले कडक निर्बंध 
उठवून बाजारपेठा उघडण्याची अनुमती द्यावी, सरकारने ठरवून दिलेल्या नियमावलीचे व्यापारी काटेकोर पालन करतील, अशी हमी राज्यातील प्रमुख व्यापारी संघटनांनी दिली आहे.
कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी ‘लोकमत’ला सांगितले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठा खुल्या करताना कोणती नियमावली असावी, याचा प्रस्ताव आम्ही सरकारला देऊ. सरकारने चर्चेची तयारी दर्शविली तर दोघांच्या समन्वयातून अंतिम नियमावली ठरविता येईल. व्यापाराला कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. आता राज्य शासनाने निर्बंध आणखी वाढवू नयेत. निर्बंध वाढवण्याचा निर्णय घेतल्यास यामुळे अनेकांचे अगणित हाल होतील असे त्यांचे मत आहे.  

...तर व्यापारी अक्षरश: कोलमडून पडतील
चेम्बर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री ॲण्ड ट्रेडचे (कॅमिट) अध्यक्ष मोहन गुरुनानी म्हणाले की, व्यापाराचे गेल्या सव्वा वर्षात कंबरडे मोडले आहे. आता कडक निर्बंध वाढविले तर व्यापारी अक्षरश: कोलमडून पडतील. व्यावसायिक प्रतिष्ठाने सरसकट सुरू करा, भलेही वेळेची मर्यादा घाला. सरकारने ठरवून दिलेले नियम पाळण्याची आमची तयारी आहे. 

‘कॅट’ने सुचविली नियमावली 
मालवाहू गाड्या बाजारपेठेत येतील तेव्हा बाजारपेठ सुरू ठेवायची की नाही, हे ठरवावे. जेथे घाऊक आणि किरकोळ व्यापार एकत्रित चालतो तेथे दोन्हींच्या वेगवेगळ्या वेळा ठरविता येतील. 
थुंकणाऱ्यास दंड करावा, विनामास्क कोणीही दिसता कामा नये. बाजारपेठेत स्वच्छतेची जबाबदारी व्यापारी संघटनेची असेल. 
ग्राहकांच्या थेट संपर्कात येणारे व्यापारी व नोकर हे मास्क आणि फेसशिल्ड घालतील. 
दुकानात एकावेळी किती लोक असतील ते क्षेत्रफळानुसार ठरवावे. दुकानात किती माल असावा, याची मर्यादा ठरवून द्यावी. रोख व्यवहारांऐवजी ई-व्यवहारावर भर द्यावा. 
दुकानाचे मालक व कर्मचाऱ्यांनी दर दोन तासांनी वाफ घेण्याची व्यवस्था दुकानातच असावी. 
दुकानमालक आणि नोकर दुकान सोडून जाणार नाहीत. ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला व लहान मुलांनी बाजारपेठेत येऊ नये, असे बोर्ड मोठ्या प्रमाणात लावावेत. 
पत्रके वाटणे, चिकटविण्यास मनाई  असावी. ग्राहकांच्या शरीराचे तापमान तपासण्याची सोय दुकानांमध्ये असावी.

Web Title: Coronavirus: We follow the rules, but lift strict restrictions, trade unions appeal to the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.